स्वराच्या मधुर गायनाने वृद्धाश्रमातील आजी-आजोबा मंत्रमुग्ध

29 Oct 2025 16:44:01
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
Swara Lad : स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील ‘मी होणार सुपर स्टार छोटे उस्ताद’ फेम बाल गायिका स्वरा मंगेश लाड हिने उमरीपठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात सादर केलेल्या मधुर गायनाने वृद्धाश्रमातील आजी आजोबा मंत्रमुग्ध झाले.
 
 
 
y29Oct-Swara
 
 
 
मूळची महागाव कसबा येथील रहिवासी स्वरा मंगेश लाड सध्या मुंबई येथे शालेय शिक्षणासोबत प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांच्याकडे गायनाचे धडे घेत असून दिवाळीच्या सुट्ट्यांत गावी आली. दरम्यान, उमरीपठार येथील वृद्धाश्रमात सहकुटुंब जाऊन तिने ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि वृद्धाश्रमातील आजी-आजोबा यांना मधुर सुरांची मेजवानी दिली. धार्मिक, देशभक्ती, सामाजिक आशय असलेल्या गीतांचे गायन करून स्वराने आजी-आजोबा यांना मंत्रमुग्ध केले. स्वराच्या गोड आवाजाने जेष्ठ नागरिक हरखून गेले. त्यांचं दुःख विसरून ‘स्वर’ वर्षावाने आनंदात न्हाऊन निघाले. वृद्धाश्रमातील आजी-आजोबा यांनी स्वराला भरभरून आशीर्वाद दिले.
 
 
औचित्य साधून वृद्धाश्रमाचे संचालक सेवाव्रती शेषराव डोंगरे व जयप्रकाश डोंगरे यांनी स्वरा लाड हिचा सन्मान केला. यावेळी स्वराची आजी, आई वडील व आत्या उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0