खडसेंच्या घरी चोरी...रहस्यमय ‘सीडी’ आणि पेनड्राईव्ह गायब!

29 Oct 2025 15:19:12
जळगाव,
Theft at Khadse's house महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात झालेल्या चोरीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला ही साधी चोरी असल्याचे समजत होते, मात्र आता या प्रकरणात धक्कादायक वळण आलं आहे. खडसे यांनी स्वतः सांगितले की, त्यांच्या घरातून केवळ सोने-चांदी आणि रोकडच नाही, तर महत्त्वाच्या सीडी, पेनड्राईव्ह आणि काही कागदपत्रांचीही चोरी झाली आहे. ही घटना २७ ऑक्टोबरच्या रात्री घडली. चोरट्यांनी खडसे यांच्या घराचे कुलूप फोडून आत प्रवेश केला आणि सहा ते सात तोळे सोने तसेच सुमारे ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. परंतु नंतर तपास करताना खडसे यांनी लक्षात आणले की त्यांच्या घरातून २५ ते ३० पेनड्राईव्ह आणि दहा सीडीजदेखील गायब झाल्या आहेत. माझ्या घरातील काही सीडी अजूनही शिल्लक आहेत. त्या मी पोलिसांना दाखवणार असून, या चोरीचा तपास त्या दिशेनेही व्हावा, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

Theft at Khadse 
 
 
त्यांनी पुढे सांगितले की, चोरट्यांना नेमके काय आणि कुठे ठेवले आहे हे माहिती होते, कारण साधे चोर एवढ्या अचूकतेने महत्त्वाची कागदपत्रं आणि डिजिटल डेटा चोरू शकत नाहीत. त्यामुळे ही चोरी रेकी करूनच केली गेली असावी, असा त्यांचा संशय आहे. चोरीच्या रात्री परिसरातील लाईट बंद होते, ज्यामुळे ही कारवाई पूर्वनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एकनाथ खडसे मुंबईहून थेट जळगावला रवाना झाले आणि आपल्या घराची पाहणी केली. त्यांनी पोलीस प्रशासनाला सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. या चोरीमागे कोणते हेतू आहेत आणि या सीडींमध्ये नक्की काय आहे, हे स्पष्ट झाले तर अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, असेही त्यांनी सूचकपणे म्हटले. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. खडसे यांच्या घरातून चोरी गेलेल्या सीडी आणि पेनड्राईव्हमध्ये काय माहिती होती, हा प्रश्न आता सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, या चोरीच्या मागे केवळ आर्थिक हेतू आहे की काही मोठे गूढ दडले आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
Powered By Sangraha 9.0