नागपूर,
nagpur-crime गावी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे २.४१ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना पारडी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेमराज सहदेव पारधी (वय ४९ वर्षे, रा. फ्लॅट क्र. १०६, जयहिंद नगर, पारडी, नागपूर) हे आपल्या कुटुंबासह २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१५ वाजता मूळ गावी गोंदिया येथे गेले होते. घर बंद असल्याने त्यांनी मुख्य दरवाजाला कुलूप लावून गावी प्रस्थान केले. मात्र, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता परत आल्यानंतर त्यांनी पाहिले असता, घराचे मुख्य दाराचे कुलूप, कडी-कोंडा तोडून उघडे होते. घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. nagpur-crime तपासणी केली असता, बेडरूममधील लाकडी कपाटातून ८५ हजार रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ४१ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी फिर्यादी खेमराज पारधी यांनी दिलेल्या तक्रारीवरून स. पो. नि. भागवत यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे तसेच स्थानिक गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही तयार करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांना “घर बंद ठेवताना विशेष दक्षता घ्यावी” असा सल्ला दिला आहे.