बायपास परिसरात वाहतुकीने गाठला बेशीस्तीचा कळस

29 Oct 2025 18:14:22
कारंजा लाड, 
washim-traffic-chaos : शहरातील बायपास परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीचा गोंधळ निर्माण झाला असून, नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. झाशी राणी चौक परिसरातून मानोरा, मंगरूळनाथ, दारव्हा आणि मुर्तीजापूर या चारही दिशांहून येणार्‍या वाहनांची मोठी वर्दळ असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतुकीचा ताण जाणवतो.
 
 

J 
 
 
 
काही वाहनचालक रस्त्यावरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी करत असल्याने रहदारी पूर्णपणे विस्कळीत होते. परिणामी वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढली आहे. पोलिसांना दररोज परिसरात गस्त घालून स्वतः वाहने हटवावी लागतात. मात्र, यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. अशाच प्रकारची घटना २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता सुमारास घडली. जेव्हा बायपास परिसरात पोलिसांना स्वतःच वाहने बाजूला करावी लागली.
 
 
पोलिसांचा वचक कमी झाल्याने काही वाहनचालक मनमानीपणे रस्त्यावर वाहन उभी ठेवत आहेत. चिरीमिरीच्या आधारे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जात असल्याची चर्चा देखील शहरात रंगली आहे. वाहतुकीच्या या गोंधळामुळे प्रवासी तसेच रहदारी करणारे नागरिक त्रस्त झाले असून, वाहतुकीची शिस्त प्रस्थापित करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी मनसेचे हरीश हेडा यांनी केली आहे.
 
 
लवकरच उपाय योजना करण्यात येईल
 
 
कारंजा पोलिस स्टेशनला प्रत्यक्षात १०० पोलिस कर्मचार्‍यांची गरज आहे, मात्र, सध्या फक्त ६० कर्मचार्‍यांवर संपूर्ण शहराची जबाबदारी पार पाडली जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात अडचण भासते. तरीही लवकरच योग्य उपाययोजना करण्यात येईल.
दिनेशचंद्र शुक्ला
ठाणेदार शहर पोलिस स्टेशन
Powered By Sangraha 9.0