अमरावती,
Indian Classical Language Council : मराठी भाषेला अभिजात भाषेचा सन्मान प्राप्त झाल्याच्या निमित्ताने राज्य शासनातर्फे ६ ते ७ ऑक्टोबर दरम्यान ११ भारतीय अभिजात भाषांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे ही परिषद होणार आहे.
अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून मराठी भाषा विद्यापीठ आणि मराठी भाषा विभागाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये होणार आहे. परिषदेसाठी ११ भारतीय अभिजात भाषांच्या ५५ प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.
परिषदेच्या उद्घाटनाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहतील. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, केंद्र शासनाचे उच्च शिक्षण सहसचिव मनमोहन कौर, म्हैसूर येथील केंद्रीय भारतीय भाषा संस्थांचे संचालक डॉ. शैलेंद्र मोहन, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल उपस्थित राहणार आहे. या परिषदेत अभिजात भाषांनी आजवर केलेल्या वाङ्मयीन आणि संशोधनात्मक कार्याविषयी चर्चा होईल.
११ भारतीय अभिजात भाषांचे भविष्यकालीन ध्येय धोरणाबाबत चिंतन करण्यात येईल. या अभिजात भाषांकडून पुढील पन्नास वर्षांच्या भविष्यकालीन योजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. भारतीय भाषांचे मूल्यवर्धित होण्यासाठी ही परिषद अधिक महत्त्वाची ठरणार आहे. परिषदेत निमंत्रित अभिजात भाषा सदस्य आपआपल्या भाषेतूनच विषयाची मांडणी करतील. इतर सदस्यांना त्यांच्या भाषेतून ते कळू शकेल, असे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू अविनाश आवळगावकर यांनी दिली.