अमरावतीत तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन

03 Oct 2025 21:45:16
अमरावती,
amravati-vidarbha-writers-literary-conference : मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने तिसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन ५ आणि ६ ऑक्टोबरला अमरावतीच्या कांचन रिसॉर्ट येथे घेण्यात येणार आहे.
 
 
 
LKL;
 
 
 
आदिवासी साहित्याच्या अभ्यासक आणि साहित्यिक उषाकिरण आत्राम या साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहे. सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. मनीषा यमसनवार , नागपूर यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. अमरावतीच्या फर्स्ट लेडी गव्हर्नर कमलताई गवई विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक ज्योत्स्ना चांदगुडे या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत आहेत. अमरावती येथील सुप्रसिद्ध उद्योजिका कांचन ल्हे यांनी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्विकारले आहे. नवीन अध्यक्षांना सूत्रे बहाल करण्याकरता पूर्व अध्यक्ष सुप्रसिद्ध कादंबरीकार विजया ब्राह्मणकर, नागपूर मंचावर उपस्थित राहणार आहेत.
 
 
३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला त्यानंतरचे हे पहिलेच वर्ष..! त्यामुळे या सप्ताहात हे साहित्य संमेलन जाणीवपूर्वक आयोजित केलेले असून अभिजात मराठी ही साहित्य संमेलनाची थीम राहणार आहे. ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरूवात होणार आहे. दोन दिवसात दहा सत्र होतील. ज्यामध्ये मराठी भाषेच्या अभिजात समृद्धीमध्ये वैदर्भीय लेखिकांचे योगदान या विषयावरील परिसंवादासह बदलती जीवनशैली या विषयावरील परिसंवाद अशा दोन परीसंवादांचे आयोजन केलेले आहे.
 
 
उद्घाटन सत्रानंतर अभिरूप न्यायालय सत्र आयोजित केलेले असून दोन दिवसांमध्ये दोन कवी संमेलने, गझल मुशायरा, सांस्कृतिक कार्यक्रम सत्र, कथाकथन सत्र, समारोप सत्र होईल. याप्रसंगी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित विदर्भ शलाका - २०२५ या विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. काही वैदर्भीय लेखिकांच्या स्वलिखित काव्यसंग्रह, कथासंग्रह, लेखसंग्रहांचे तसेच गीतांचे प्रकाशन याप्रसंगी होणार आहे . विविध क्षेत्रांमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण कार्याचा ठसा उमटवणार्‍या वैदर्भीय स्त्री रत्नांचा विदर्भ स्त्रीरत्न पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विजया मारोतकर, सचिव मंगेश बाबसे, कोषाध्यक्ष डॉ. माधव शोभणे आणि सर्व पदाधिकारी या साहित्य संमेलनाच्या यशस्वीते झटत आहेत.
Powered By Sangraha 9.0