आपसी व्यवहार सद्भावपूर्ण, संयमी असावेत

03 Oct 2025 20:28:05
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
रा. स्व. संघ विजयादशमी उत्सव
नागपूर, 
समाजातील सर्व घटकांचे आपसातील व्यवहार सद्भावपूर्ण व संयमी असणे आवश्यक आहे. श्रद्धा, महापुरुष व प्रार्थनास्थळे वेगवेगळी असतात. परंतु मन, वचन व कर्माद्वारे त्यांचा अवमान होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे, प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक Dr. Mohanji Bhagwat डॉ. मोहनजी भागवत यांनी रेशीमबाग मैदानावर गुरुवारी आयोजित संघाच्या विजयादशमी उत्सवात केले. यंदाचे वर्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे, हे विशेष.
 
 
rss-0688
 
व्यासपीठावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सह संघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित आपल्या उद्बोधनात सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित करीत डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले की, कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी समाजाची एकता हा सर्वांत महत्त्वाचा घटक ठरतो. देशातील विविधता भेदाचे कारण बनू नये. आपण एका मोठ्या समाजाचा अविभाज्य भाग आहोत. समाज, देश, संस्कृती व राष्ट्राच्या नात्याने आपण एक आहोत. ही मोठी ओळख आपल्यासाठी आहे.
 
 
सामाजिक सद्भाव निर्माण करण्यासाठी नियम व व्यवस्थेचे पालन, सद्भावपूर्वक आचरण अंगी बाळगणे आवश्यक आहे. छोटे-मोठे वाद किंवा केवळ मनातील शंकांमुळे कायदा हाती घेण्याची, गुंडागर्दी, हिंसा करण्याची प्रवृत्ती योग्य नाही. एखाद्या विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करण्याच्या घटना मुद्दाम घडवून आणल्या जातात. त्यांच्या कचाट्यात अडकण्याचे परिणाम तात्कालिक व दीर्घकालीन दोन्ही दृष्टीने वाईटच आहेत. अशा प्रवृत्तींवर बंधन घालणे आवश्यक आहे. शासन-प्रशासनाने कोणताही पक्षपात न करता व कोणत्याही दबावाला बळी न पडता, नियमांनुसार आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असेही डॉ. मोहनजी म्हणाले.
 

rss-0360 
 
संपूर्ण हिंदू समाजाचे सामर्थ्यसंपन्न, शीलसंपन्न व संघटित स्वरूप हीच देशाच्या एकता, एकात्मता, विकास व सुरक्षेची खरी हमी आहे. हिंदू समाजच विभाजनवादी मानसिकतेपासून मुक्तअसून, तो सर्वसमावेशक आहे. भारताला वैभवशाली तसेच संपूर्ण विश्वासाठी अपेक्षित व उचित असे योगदान देणारा देश घडविणे, हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे.
स्वदेशी व स्वावलंबन
Dr. Mohanji Bhagwat डॉ. मोहनजी पुढे म्हणाले, स्वहिताला केंद्रस्थानी ठेवून अमेरिका आयात शुल्काचे जे धोरण राबवीत आहे, ते लक्षात घेता आपल्यालाही काही बाबींचा करावा लागेल. जग हे परस्परावलंबनावर उभे आहे; पण ते परस्परावलंबन आपला नाईलाज ठरू नये. त्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल. स्वदेशी व स्वावलंबनाला कुठलाही पर्याय नाही.
 
 
शेजारच्या देशांत प्रचंड उलथापालथ
डॉ. भागवत म्हणाले की, मागील काही वर्षांत आपल्या शेजारच्या देशांत प्रचंड उलथापालथ झाली आहे. श्रीलंका, बांगलादेश व अलीकडेच नेपाळ येथे हिंसक उद्रेक होऊन सत्तांतर घडले. आपल्या देशात तसेच जगभरात अशा प्रकारच्या उपद्रवांना प्रोत्साहन देणार्‍या शक्ती सक्रिय आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. ते म्हणाले, शासन-प्रशासन व समाज यांच्यातील तुटलेले नाते, लोकाभिमुख व कार्यकुशल प्रशासकीय कामकाजाचा अभाव, ही असंतोषाची स्वाभाविक व क्षणिक कारणे असतात. हिंसक उद्रेक समाजात अपेक्षित बदल घडवून शकत नाहीत. लोकशाही मार्गानेच असे आमूलाग्र परिवर्तन घडविणे शक्य आहे. आपले शेजारी देश सांस्कृतिकदृष्ट्या तसेच दैनंदिन संबंधांच्या बाबतीत भारताशी निगडित आहेत. एका अर्थाने ते आपल्याच कुटुंबाचा भाग आहेत. तेथेही शांतता, स्थैर्य, प्रगती व सुख-सुविधा उपलब्ध असणे, हे आपल्यासाठीही आवश्यक आहे.
आशा व आव्हाने
सरसंघचालक म्हणाले, एका बाजूला सध्याचा काळ विश्वास व आशा अधिक दृढ करणारा, तर दुसर्‍या बाजूला आपल्यापुढील जुन्या व नव्या आव्हानांना अधिक स्पष्टपणे समोर आणणारा आहे. तो आपल्यासाठी निश्चित केलेल्या कर्तव्यमार्गाचे मार्गदर्शन करणाराही आहे, हे सांगताना त्यांनी प्रयागराज महाकुंभ व पहलगाम घटनेचा उल्लेख केला. राष्ट्रीय सुरक्षेच्या आवश्यकतेवर भर देताना सरसंघचालक म्हणाले की, इतर देशांशी मित्रत्वाचे धोरण भावना राखताना आपल्या सुरक्षेबाबत अधिक सजग राहणे व सामर्थ्य वाढवीत राहणे गरजेचे आहे. धोरणात्मक घडामोडींमुळे जगातील अनेक देशांमध्ये आपले मित्र कोण व ते कुठपर्यंत आहेत, हेही स्पष्ट झाले.
 
पंचपरिवर्तन महत्त्वपूर्ण
आमच्या एकतेच्या आधाराचे वर्णन डॉ. आंबेडकर यांनी ‘अन्तर्निहित सांस्कृतिक एकता’ असे केले आहे. भारतीय संस्कृती ही प्राचीन काळापासून आलेली वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे व ती सर्वसमावेशक आहे. व्यक्ती व समूह या दोन्ही पातळ्यांवर वैयक्तिक तसेच राष्ट्रीय चारित्र्य सुदृढ होणे आवश्यक आहे, असे सरसंघचालक म्हणाले. राष्ट्राच्या स्वरूपाची स्पष्ट कल्पना व गौरव संघाच्या शाखेतच मिळतो. दैनंदिन शाखेतील नियमित कार्यक्रमांमुळे स्वयंसेवकांमध्ये व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व, नेतृत्व, निष्ठा व समजूतदारपणा विकसित होतो. त्यामुळे शताब्दी व्यक्तिनिर्माणाचे कार्य देशभरात सर्वव्यापी व्हावे व सामाजिक आचरणात सहज बदल घडवून आणणारा पंचपरिवर्तन कार्यक्रम- सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्व-बोध व स्वदेशी, नागरिक अनुशासन व संविधानाचे पालन स्वयंसेवकांच्या आचरणातून समाजव्यापी व्हावा, असा संघाचा प्रयत्न राहील. समाजातील अनेक संघटना, व्यक्ती असे कार्यक्रम राबवीत असून त्यांच्यासोबत संघाच्या स्वयंसेवकांचा सहयोग व साधला जात आहे, असे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
डॉ. हेडगेवार, डॉ. आंबेडकर प्रेरणास्रोत : रामनाथ कोविंद
Dr. Mohanji Bhagwat समारंभाचे प्रमुख पाहुणे व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले की, आजचा विजयादशमीचा दिवस संघाच्या शतकपूर्तीचा दिवस आहे. नागपूरची ही पवित्र भूमी आधुनिक भारताच्या निर्मात्यांच्या पावन स्मृतींशी जुळलेली आहे. त्या राष्ट्रनिर्मात्यांमध्ये डॉक्टर्स आहेत, ज्यांचे माझ्या जीवनाच्या उभारणीत अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान राहिले आहे. ते दोन्ही महापुरुष म्हणजे डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार व डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात अंतर्भूत सामाजिक न्यायाच्या व्यवस्थेच्या बळावरच माझ्यासारख्या व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचता आले. डॉ. हेडगेवार यांच्या विचारांच्या प्रभावामुळे समाज व राष्ट्र घेण्याचा माझा दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाला. या दोन्ही विभूतींच्या राष्ट्रीय एकता व सामाजिक समरसतेच्या आदर्शांमुळे माझ्यात जनसेवेची भावना रुजली. आज भारतीयांना वैयक्तिक व राष्ट्रीय चारित्र्याने समृद्ध जीवनमार्गाची गरज आहे. आपला सनातन, आध्यात्मिक व समग्र दृष्टिकोनच मानवतेच्या मन, बुद्धी व अध्यात्माचा विकास घडवितो. केवळ भाषणांमुळे सामाजिक वर्तनामध्ये बदल घडून येत त्यासाठी व्यापक प्रबोधन आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0