सात वर्षीय चिमुकल्याचा जीव घेणारा बिबट जेरबंद

03 Oct 2025 14:43:13
सिंदेवाही,
leopard captured घराच्या उंबरठ्यावरून उचलून नेत सात वर्षीय चिमुकल्याचा जीव घेणार्‍या मादी बिबट्याला गुरूवार, 2 ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव लगतच्या गडबोरी गावातील 7 वर्षीय प्रशिल मानकर हा 18 सप्टेंबर रोजी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपातून महाप्रसाद घेऊन काकांसोबत घरी परत आला होता. घरात प्रवेश करीत असतानाच घराच्या उंबरठ्यावरून बिबट्याने त्याला उचलून नेले आणि गावालगतच्या पहाडी भागात घेऊन गेला.
 

बिबट  
 
 
या हल्ल्यात प्रशिलचा मृत्यू झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी 6 वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती व संतापाची लाट उसळली होती. वन विभागाला नागरिकांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. घटनेनंतर त्वरित वनविभागाने घटनास्थळी ट्रॅप व लाईव्ह कॅमेरे बसवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. सततच्या निरीक्षणानंतर घटनेस जबाबदार असलेला बिबट निश्चित करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम राबविण्यात आली. गुरुवारी सकाळी बिबट वनविभागाने तयार केलेल्या नैसर्गिक गोठ्यात अडकल्याचे लक्षात येताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व शुटर ए. सी. मराठे यांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या सहकार्याने 4 वर्षाच्या मादी बिबट्याला रायफलच्या सहाय्याने बेशुद्ध करून सुरक्षितपणे पिंजर्‍यात जेरबंद करण्यात आले.leopard captured या मोहिमेकरिता ब्रम्हपुरी वनविभागाचे उप वनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सहायक वरसंरक्षक (तेंदू) डॉ. एम. बी. गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार यांच्या नेतृत्वात एन. टी. गडपायले, एस. बि. उसेंडी, पी. एस. मानकर, आर. जी. कोडापे, बी. डी. चिकाटे, आर. के. उईके, वाय. एम. चौके, आर. एम. सुर्यवंशी तसेच सिंदेवाही परिक्षेत्रातील वनरक्षक, पीआरटी सदस्य, गस्तीपथक चमू, सॉब नेचर फाऊंडेशन व वनमजूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0