बुलढाणा,
Mahatma Gandhi Jayanti : महात्मा गांधी जयंतीनिमित्त बुलडाणा जिल्हा कारागृह वर्ग-२ येथे बंद्यांमध्ये गांधी विचारांची रुजवणूक करून त्यांना जबाबदार नागरिक बनविण्याच्या उद्देशाने गांधी शांती परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेचे आयोजन मुंबई सर्वोदय मंडळ, मुंबई तसेच बुलडाणा जिल्हा सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या परीक्षेमध्ये एकूण ४३ बंदीजनांनी सहभाग घेतला. परीक्षेत प्राविण्य मिळविणार्या बंद्यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले तर इतर सहभागी बंद्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सर्वोदय मंडळाच्या अध्यक्षा लता ओंकार राजपुत उपस्थित होत्या. यावेळी सर्वोदय मंडळ कार्यकर्ते रमेश वानखेडे व नभिजितसिंह ओंकारसिंह राजपुत यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कारागृह अधीक्षक मेघा कदम-बाहेकर, तुरुंगाधिकारी उमेश नाईक, सुभेदार दरेसिंग चव्हाण तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कारागृह शिपाई वैभव राणे, दिनेश डोंगरदिवे, उमेश बोंद्रे, जितेश काळवाघे, चंद्रकांत महाले व अश्विनी भालके यांचे विशेष सहकार्य लाभले.