बुलढाणा,
Prataprao Jadhav : जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या दुरुस्ती व सुधारणा कामांना मोठा दिलासा मिळाला असून, तब्बल १४२ कोटी रुपयांच्या कामांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने मंजुरी दिली आहे. या कामांत मेहकर तालुयातील पेनटाकळी प्रकल्पातील दोन कोल्हापुरी बंधार्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर (५६.५३ कोटी), लोणार तालुयातील शिवणी जाट, तांबोळा, गारखेड लघु प्रकल्पांचे कालवा व धरणभिंत दुरुस्ती (१४.०२ कोटी), मेहकरातील कंबरखेड व सोनाटी कोप बंधार्यांची दुरुस्ती (१.५ कोटी) यांचा समावेश आहे.

तर जळगाव जामोद, खामगाव, देऊळगाव राजा आणि मलकापूर तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पांच्या दुरुस्ती, कालवा व वितरण प्रणाली सुधारणा कामांना ८४.७० कोटींची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील धरणभिंत, सांडवा, कालवा व वितरण प्रणाली सुधारण्यासाठीची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून, आमदार आकाश फुंडकर व आमदार संजय कुटे यांचेही सहकार्य लाभले आहे. मंत्रालयात झालेल्या ८७व्या नियामक मंडळाच्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हे ठराव मंजूर करण्यात आले. या मंजुरीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती आणि विस्ताराच्या कामांना वेग येणार आहे.