मुंबई,
simi garewal controversy विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी भारतभरात रावण दहनाच्या परंपरेनुसार चांगल्याचा वाईटावर विजय साजरा केला जातो. मात्र यंदा, 2 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा झाल्यानंतर बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून रावणाचे कौतुक करत एका नव्या वादाला सुरुवात केली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून, सिमी गरेवाल यांना नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
दसऱ्याच्या दिवशी, सिमी गरेवाल यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी रावणाला "वाईट" म्हणण्याऐवजी "थोडा खोडकर" असे संबोधले. त्यांनी लिहिले, “प्रिय रावण, दरवर्षी या दिवशी आपण चांगल्याचा वाईटावर विजय झाल्याचा उत्सव साजरा करतो, पण तांत्रिकदृष्ट्या तुमच्या वर्तनाला ‘वाईट’ऐवजी ‘थोडं खोडकर’ असे म्हणणे योग्य ठरेल. शेवटी तुम्ही फक्त एका स्त्रीचं अपहरण केलं... पण तुम्ही तिचा सन्मान राखला, तिला सुरक्षितता दिली, चांगलं अन्न आणि निवारा दिला.”
या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी सिमी गरेवाल यांच्यावर रावणासारख्या पौराणिक खलनायकाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप केला. एका युजरने प्रत्युत्तरात लिहिले, “रावण कोणताही 'सन्मान' राखणारा नव्हता. त्याने रंभा नावाच्या अप्सरेशी गैरवर्तन केलं होतं आणि त्याच्या पापांमुळेच त्याला शाप मिळाला होता. शापाच्या भीतीनेच तो सीतेच्या जवळ गेला नाही, हे सन्मान नव्हे, तर भीती होती.”
सिमीने simi garewal controversy तिच्या पोस्टमध्ये रावणाला "उच्च शिक्षित, नम्र आणि सभ्य" ठरवत, रामायणातील घटनांवर आपली स्वतंत्र मते मांडली. तिने नमूद केलं की, “रामांनी जेव्हा तुम्हाला ठार केलं, तेव्हा तुम्ही माफी मागितली. तुम्ही संसदेत बसणाऱ्या अनेक नेत्यांपेक्षा जास्त शहाणे होता.”यावरूनही अनेकांनी आक्षेप घेत, तिला "इतिहासाचा अपुरेपणा असलेली व्यक्ती", "संस्कृतीचा अपमान करणारी" अशी टिका केली.वादाच्या झोतात आल्यानंतर सिमी गरेवाल यांनी त्यांच्या पोस्टवर येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे ती पोस्ट हटवली. मात्र, ती हटवण्यापूर्वी स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले असून सोशल मीडियावर या विषयावर अजूनही चर्चेचा सूर कायम आहे.सिमी गरेवाल यांचा सिनेसृष्टीत स्पष्टवक्तेपणासाठी ओळख आहे. मात्र पौराणिक कथांचे विश्लेषण करताना त्यांनी वापरलेली भाषा आणि दृष्टिकोन अनेकांना खटकला आहे. काही समर्थकांनी सिमीच्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचं सांगितलं असलं, तरी बहुसंख्य सोशल मीडिया वापरकर्ते आणि धर्मनिष्ठांनी तिच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
दसऱ्यासारख्या पारंपरिक सणाच्या दिवशी रावणाच्या उघडपणे केलेल्या प्रशंसेने एकूणच वातावरणाला वेगळा वळण दिला आहे. हा वाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत असून, सिमी गरेवाल यांच्याकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.