अहिल्यानगर,
Snake bites Talatha himself अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून महसूल विभागाकडून शेतशिवारात जाऊन पंचनाम्याचे काम सुरू आहे. अशाच पंचनाम्यासाठी गेलेल्या तलाठ्याला साप चावल्याची घटना जामखेड तालुक्यातील धनेगाव परिसरात घडली. आकाश रामभाऊ काशिकेदार (तलाठी, धनेगाव) असे जखमी तलाठ्याचे नाव आहे.
दसऱ्याच्या दिवशीदेखील जबाबदारी पार पाडत सकाळी आठ वाजता आकाश काशिकेदार यांनी धनेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले होते. यावेळी शेतकरी सुहास काळे, संदीप काळे आणि प्रमोद काळे यांच्या शेताकडे जात असताना नदीकाठच्या गवतात दबा धरून बसलेल्या सापावर त्यांचा पाय पडला. क्षणातच सर्पदंश झाला आणि त्यांना भोवळ यायला लागली.
सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने त्यांना उचलून जवळच्या वस्तीवर नेले. नदीमुळे गाडी थेट पोहोचू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांना खांद्यावर घेत बंधाऱ्यावरून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले. शेवटी त्यांना शिलादीप हॉस्पिटल, जामखेड येथे दाखल करण्यात आले. सुहास काळे, संदीप काळे, वैभव काळे, अनिल काळे, पवन काळे आणि मनोज काळे या शेतकऱ्यांनी विशेष धावपळ करून मदत केली. त्यांच्या मदतीमुळेच तलाठी काशिकेदार यांना वेळेत उपचार मिळाले. घटनेची माहिती मिळताच विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन तलाठींची विचारपूस केली. तातडीने उपचार झाल्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.