वर्धा,
Wardha News : वर्धेतील शोयब पठान नामक मद्यधुंद युवकाने स्टेशन फैल भागात दुर्गादेवी उत्सवात सुरू असलेल्या गरबात प्रवेश करून राडा घातला. हिंदूंविषयी अपशब्द काढले. ही घटना २ रोजी रात्री घडली. या प्रकरणी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आज शुक्रवारी दुर्गा पुजा उत्सव समितीच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी एकत्र येत संबंधित प्रकरणातील आरोपीने महिलांसह देवीची माफी मागावी या मागणीसाठी स्थानिक बजाज चौक परिसरात ५ तास रस्तारोको आंदोलन केले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.

गरबात प्रवेश केलेल्या शोयब पठान याने हिंदू समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. ही बाब गंभीर असल्याने संबंधित प्रकरणी तातडीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान, आज शुक्रवारी दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ही विसर्जन मिरवणूक दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास बजाज चौक परिसरात आली असता संबंधित घटनेच्या निषेधार्थ संतप्तांनी थेट रस्तारोको आंदोलन केले. आरोपीने दुर्गादेवी तसेच महिलांची माफी मागावी त्याशिवाय आम्ही दुर्गा विसर्जन करणार नाही, असा निर्णय घेत बजाज चौकात रास्ता रोको केला.
बजाज चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना कळताच त्यांनी संबंधित घटना व पोलिसांनी केलेल्या कारवाई बाबतची माहिती पोलिस अधिकार्यांकडून घेतली. त्यानंतर भाजपचे निलेश पोहेकर, आशिष कुचेवार यांच्या नेतृत्वातील शिष्ट मंडळाने आंदोलकर्त्यांसह चर्चा करून शांतता कायम राखण्याचे आवाहन केले.
या प्रकरणी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांनी दिली. वर्धा शहरात शांतता राहवी. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आम्ही सर्व धर्माचा आदर करतो. जो असे कृत्य करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही समाज अशा घटनांचा निषेध करतो, या संदर्भात लक्ष्मीनगर येथील मशिदीत आम्ही चर्चा केली अशी माहिती हाजी मोहम्मद एजाज, प्रा. अब्दुल मुलीन, इक्राम हुसैन, इद्रिस मेमन, अतकरखान बिल्डर आदींनी दिली.