अचलपूर रुग्णालयात स्त्री रुग्ण ताटकळत

30 Oct 2025 20:29:25
अचलपूर, 
achalpur-hospital : अचलपूर जिल्हा स्त्री व बाल रुग्णालयात अचलपूर तालुक्यासह मेळघाट, अंजनगाव, दर्यापूर व चांदूरबाजार तसेच आदी ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची उपचारासाठी प्रचंड गर्दी असते. गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू होणारी ओपीडी दुपारी १२ वाजूनही सुरू न झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. सदर प्रकार नेहमी होत असल्याचा रुग्णांचा आरोप आहे.
 
 
 
J
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, गुरूवार, ३० ऑक्टोबरला अचलपूर येथील स्त्री व बाल रुग्णालयात विषेश ओपीडी आयोजित करण्यात आली होती. गुरुवारी ग्रामीण भागासह चांदुर बाजार, अंजनगाव व मेळघाटातील गरोदर महिलांना तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. स्त्री रोग तज्ञ डॉक्टरकडून तपासणी केली जाणे अपेक्षित असतांना दीडशे ते दोनशे गरोदर महिला तपासणीसाठी आल्या असताना संबंधित डॉक्टर उपस्थित नसल्याने व तीन ते चार तासाचा अवधी उलटल्यानंतरही तपासणी सुरू न झाल्याने काही रुग्णांच्या नातेवाईकांनी फोटो आणि व्हिडीओ काढून आमदाराकडे पाठविले, तसेच सोशल मीडियावर टाकले.
 
 
त्यावेळी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी मनाई करीत तंबी दिली. गोधळ वाढत असल्याचे पाहून एका डॉक्टरांकडून त्या गरोदर महिलांची तपासणी सुरू करण्यात आली; पण यावेळी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अनुपस्थित होते. येथे गरोदर महिलांची विशेष तपासणी दर गुरुवारी केली जाते. मात्र, डॉक्टरांची अनुपस्थिती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. श्रेणीवर्धन होऊन येथे जिल्हा स्त्री व बाल रुग्णालय निर्माण होत असल्याने याचा फायदा मतदारसंघासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना होणार, अशी आशा होती; पण आजच्या या प्रकरामुळे प्रश्न निर्माण झाला आहे . याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे .
 
 
///अधीक्षक म्हणतात, माहिती घेतो
 
 
याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय सिरसकर यांना विचारले असता ते म्हणाले की, आज सकाळी काही रुग्णांचे नातेवाईक माझ्याकडे आले होते. आज ओपीडी उघडायला वेळ झाला, असे त्यांचे म्हणणे होते. उघडायला का वेळ झाला, त्याची माहिती घेतो.
Powered By Sangraha 9.0