बीड,
Ajit Pawar's forged signature राज्यात बनावट पत्रे आणि ओळखपत्रांच्या फसवणुकीच्या घटना वाढत असताना, आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्हा नियोजन कार्यालयात अजित पवार यांच्या बनावट सही आणि शिक्का असलेले पत्र सादर करण्यात आले, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील अशोक वाघमारे या व्यक्तीविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघमारे यांनी अजित पवार यांच्या नावाने बनावट सही आणि शिक्का वापरून पत्र तयार केले आणि ते थेट जिल्हा नियोजन कार्यालयात सादर केले. मात्र, अधिकाऱ्यांच्या लक्षात संशयास्पद बाबी आल्याने चौकशी करण्यात आली असता सही बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला आणि आरोपीविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या फसवणुकीमुळे केवळ प्रशासनच नव्हे तर उच्चपदस्थ नेत्यांच्या नावाने चालणाऱ्या दस्तऐवजांच्या विश्वसनीयतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, याआधी जुलै 2025 मध्येही बीड जिल्ह्यात अशाच स्वरूपाची फसवणूक झाली होती. त्या वेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नावाने बनावट लेटरहेड आणि सही वापरून तब्बल तीन कोटी वीस लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सही करून पत्र सादर केल्याने प्रशासकीय सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.