मूल,
bear climbed straight up tree सध्या जिल्ह्यात वाघाची दहशत सुरु असताना मूल शहराला लागून असलेल्या उमा नदीकाठावरील मात्र अस्वलने धुमाकुळ घातला आहे. एका झाडावर बुधवारी, रात्री 9 वाजताच्या सुमारास हे अस्वल बसलेले आढळून आले. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. अस्वलला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मूल-नागपूर मार्गावरील नदी लगतच्या परिसरातील एका शेतात काही नागरिकांना अस्वल दिसली. त्यानंतर ती रस्त्यावर आली.
या अस्वलीला हुसकावून लावण्यासाठी काहींनी फटाके फोडले. त्यामुळे घाबरून जाऊन ती रस्त्यालगत असलेल्या एका झाडावर चढून बसली. याबाबत कळताच अस्वलला बघण्यासाठी नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. काही नागारिकांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी त्या परिसरात बंदोबस्त लावला. नागरिकांची गर्दी कमी झाल्यानंतर रात्री 12.30 वाजताच्या सुमारास अस्वलीने झाडावरून उतरून जंगलाच्या दिशेने पळ काढला.