मुंबई,
Benefits only for deserving sisters ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा मिळणाऱ्या १,५०० रुपयांच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र, ऑक्टोबर महिना संपत आला असतानाही अनेक महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पात्र महिलांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक बळ देणे हा असून, लाभ मिळण्यासाठी काही ठराविक पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांनुसार महाराष्ट्राची रहिवासी, वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असलेल्या, आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळू शकतो. तसेच एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्रता मिळते. लाभार्थीचे आधारकार्ड आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणेही बंधनकारक आहे.
दरम्यान, शासनाने अलीकडेच पात्रता पडताळणी मोहीम सुरू केली असून, यात अनेक महिलांचे अर्ज नियमबाह्य असल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याचे दिसून आले आहे, तर काहींच्या नावावर चारचाकी वाहने किंवा जास्त उत्पन्न असल्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविकांकडून घराघरांत जाऊन पडताळणी केली जात असून, केवळ खरी पात्र महिलांनाच पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, ज्यांची पात्रता पडताळणी पूर्ण झाली आहे, अशा महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. त्यामुळे योग्य लाभार्थींना पुढील काही दिवसांतच ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. राज्यभरातील महिलांचे डोळे आता या हप्त्याच्या प्रतीक्षेत असून, शासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.