बँकॉक,
Black dress is mandatory in Thailand थायलंडमध्ये सध्या काळ्या कपड्यांचा तुटवडा निर्माण झाला असून, तेथील दुकाने अक्षरशः रिकामी पडली आहेत. देशभरात लोक काळे कपडे परिधान करताना दिसत आहेत. याचे कारण म्हणजे थायलंडच्या राष्ट्रमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी सिरिकिट यांचे निधन. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर संपूर्ण देश शोकमग्न झाला आहे. थायलंड सरकारने यानिमित्त ३० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.
या काळात सरकारी अधिकाऱ्यांना एक वर्ष काळे कपडे घालणे बंधनकारक करण्यात आले असून, सामान्य नागरिकांना ९० दिवस काळे, पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये काळ्या कपड्यांची मागणी अचानक वाढली आहे. थायलंडमधील दुकानदारांनी रंगीत कपड्यांच्या जागी काळ्या कपड्यांचे प्रदर्शन सुरू केले आहे. एका वृत्तानुसार, अनेक ठिकाणी काळ्या कपड्यांचा पुरवठा संपुष्टात आला आहे.
भारतामध्ये शोककाळात पांढरा रंग परिधान करण्याची प्रथा असली, तरी थायलंडमध्ये काळा रंग हा शोकाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे संपूर्ण देशात काळ्या रंगाची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. राणी सिरिकिट या थायलंडच्या राजा भूमिबोल अदुल्यादेज यांच्या पत्नी आणि सध्याचे राजा महा वाजिरालोंगकोर्न यांच्या माता होत्या. त्यांनी थाई संस्कृती, ग्रामीण विकास आणि पारंपारिक हस्तकलेला विशेष प्रोत्साहन दिले. म्हणूनच त्यांना थायलंडच्या लोकांनी “राष्ट्रमाता” म्हणून गौरवले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार, राष्ट्रीय ध्वज ३० दिवस अर्ध्यावर फडकवला जाईल आणि अधिकृत शोक एक वर्ष चालेल. तथापि, पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे की काळे कपडे परिधान करणे ही सक्ती नाही, तर फक्त एक विनंती आहे. दरवर्षी लाखो भारतीय पर्यटक थायलंडला भेट देतात. त्यामुळे या काळात प्रवास करणाऱ्यांसाठी काही सूचना दिल्या गेल्या आहेत. थायलंडमध्ये मंदिरे, राजवाडे किंवा सरकारी ठिकाणी भेट देताना काळे, पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावेत. तसेच, जर पूर्ण काळा पोशाख नसेल, तर काळी रिबन बांधून आदर व्यक्त करता येतो.
सार्वजनिक ठिकाणी शांतता राखणे आणि थायलंडमधील शोकमय वातावरणाचा आदर करणे आवश्यक आहे. नाईटक्लब, हॉटेल्स किंवा बार यावर कोणताही अधिकृत बंदी आदेश नसला तरी, देशाच्या वातावरणाची जाणीव ठेवून वर्तन करणे योग्य ठरेल. थाई पर्यटन प्राधिकरणाने म्हटले आहे, थायलंड नेहमीप्रमाणेच पर्यटकांसाठी खुले आणि स्वागतार्ह आहे, पण सध्याच्या परिस्थितीत संवेदनशीलता दाखवणे हीच खरी आदरांजली ठरेल.