तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
vikas meena जिल्हा वार्षिक योजनेतून विभागांची विविध विकासविषयक कामे मंजूर केली जातात. त्यासाठी आर्थिक तरतूद देखील दिली जाते. विभागांनी मागील वर्षाची मंजूर आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले. महसूल भवनात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनेंतर्गत मागील वर्षी मंजूर कामे व या कामांवर झालेला खर्च, या योजनांचे चालू आर्थिक वर्षाचे प्रस्ताव, खासदार विकास कार्यक्रम, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर कामांची प्रगती व या सर्व योजनांवरील अखर्चीत निधीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले.

बैठकीला प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अमोल मेतकर, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहायक आयक्त समाजकल्याण मंगला मून यांच्यासह सर्व विभागाचे जिल्हास्तर अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात विभागांना मंजूर निधी व कामे तसेच कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ज्या विभागांची कामे अद्यापही प्रलंबित आहेत, त्यांनी ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.vikas meena येत्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने कामे करण्यावर निर्बंध येतील, त्यामुळे कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विकास कामे करताना कामांचा प्राधान्यक्रम ठरविला पाहिजे. जी कामे तातडीने करणे आवश्यक आहे, अशी कामे आधी घेण्यात यावी. काम करताना ती उत्तम दर्जाची असावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी जिल्हा वार्षिक योजनेच्या तिनही उपयोजनांचा त्यांनी विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला.