चंद्रपूर,
Chandrapur News : यंदा दिवाळीची सुरूवात 18 ऑक्टोबरच्या धनत्रयोदशीपासून झाली. त्या दिवशी शनिवार म्हणजे, शासकीय सुटीचा दिवस होता. त्यामुळे शुक्रवार, 17 ऑक्टोबरपासूनच जिल्हा परिषद व अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी आपापल्या गावी निघून गेलेत. पुढचा आठवडाभर दिवाळीची सुटी होती. अपवाद होता तो केवळ शुक्रवार, 24 ऑक्टोबरचा, त्यामुळे अधिकार्यांनी बरोबर 24 ऑक्टोबरची सुटी टाकली.
आता सलग 9 दिवसांची सुटी त्यांनी उपभोगली. खरे तर, सोमवार, 27 ऑक्टोबरला त्यांनी पूर्ववत कर्तव्यावर येणे अपेक्षित होते. पण अनेक अधिकारी अद्यापही रूजू झालेले नाही. सोमवारपासून आणखी काही दिवसांच्या सुट्ट्या टाकून ‘लाँग टूर एन्जॉय’ करताहेत! या यांच्या आनंदात सर्वसामान्य ग्रामस्थ आणि नागरिकांची कामे मात्र खोळंबली आहे. ते बिच्चारे दररोज जिल्हा परिषद, महानगरपालिका व जिल्हा प्रशासनचे प्रशासकीय भवनात चकरा मारताहेत!! जवळपास 15 दिवस होत आहे, शासकीय कार्यालये ठप्प पडली आहे!!!
दिवाळीनंतर अद्यापही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जवळजवळ सर्वच उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सामन्य प्रशासन, वित्त विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभागाचे विभाग प्रमुख, अन्य अधिकारी आणि बरेच कर्मचारी सुट्टीवर आहेत. त्यातील काही जण प्रशिक्षणासाठी गेल्याचे त्यांच्या कार्यालयातून तभा प्रतिनिधीला सांगण्यात आले. एकूण काय तर, जिल्हा परिषदेत शुकशुकाट आहे. गावातून आलेले ग्रामस्थ रोज त्यांच्या कामासाठी चकरा मारत आहेत. एकाच वेळी जवळपास सारे अधिकारी व कर्मचार्यांच्या सुट्टीने महत्त्वाची कामे खोळंबली आहे!
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह यांच्यासह उप मुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता छबू बाराहाते आदी अधिकारी सुट्टीवर असून, कार्यालयात कामावर येणार्या नागरिकांना सर/ मॅडम सोमवारी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जवळपास हीच स्थिती चंद्रपूर शहर महानगरपालिकेची, जिल्हा प्रशासनाच्या प्रशासकीय भवनातील सार्या विभागांच्या कार्यालयाची आहे. लवकरात लवकर हे अधिकारी व कर्मचारी कामावर रूजू व्हावे आणि आमची कामे व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता करीत आहे.