बागपतमध्ये उत्खननात सापडला ५,००० वर्षे जुना खजिना

30 Oct 2025 12:52:39
बागपत,
excavation in Baghpat बागपत जिल्ह्यातील सिसाना गावात झालेल्या उत्खननादरम्यान तब्बल ५,००० वर्षे जुन्या खजिन्याचे अवशेष सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. खांडवारी परिसरातील या उत्खननात प्राचीन विटा, मातीची भांडी, हाडे आणि मंदिरासारखी रचना सापडल्याने स्थानिकांमध्ये धार्मिक उत्साह निर्माण झाला. या स्थळावर गावकऱ्यांनी पूजा-अर्चा आणि दिवे लावण्यास सुरुवात केली, मात्र पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) पथकाने घटनास्थळी पोहोचताच पूजा थांबवण्यात आली.
 
 
excavation in Baghpat
 
 
मेरठ येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे अधीक्षक विनोद सिंग रावत आणि त्यांचे सहाय्यक विवेक कुमार यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय पथक बुधवारी सिसाना गावात दाखल झाले. त्यांनी उत्खननादरम्यान सापडलेल्या अवशेषांचे नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या ठिकाणी लखोरी विटांनी बनवलेली एक रचना सापडली असून ती मंदिरासारखी दिसत असली तरी, पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, तिला प्रत्यक्षात मंदिर म्हणणे सध्या योग्य ठरणार नाही.
 
 
तपासादरम्यान मातीच्या थराखाली एक पाण्याचा स्रोतही सापडला आहे, ज्याचे काही अवशेष अद्याप अस्तित्वात आहेत. प्राथमिक निरीक्षणात या संरचनेचा आणि वस्तूंचा संबंध प्राचीन “खंडवारी संस्कृती”शी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही जागा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय वारशाचा भाग असल्याने तिचे बारकाईने संवर्धन आणि वैज्ञानिक तपासणी केली जाणे आवश्यक आहे. या स्थळावरील अवशेष चुकीच्या हातात पडू नयेत, यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 
 
दरम्यान, स्थानिक लोकांनी या रचनेला दैवी रूप मानत तेथे दिवे लावून पूजा केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून हे स्थळ वैज्ञानिक तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या शोधामुळे बागपत जिल्ह्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, तज्ञांच्या मते ही स्थळे प्राचीन भारतीय सभ्यतेच्या उत्क्रांतीचे मौल्यवान पुरावे ठरू शकतात.
Powered By Sangraha 9.0