नवी दिल्ली,
ICC ODI Rankings Virat आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय रँकिंगमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठी झेप घेतली आहे. तब्बल १८ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर रोहित पहिल्यांदाच आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत केलेल्या झंझावाती कामगिरीच्या जोरावर ‘हिटमॅन’ने किंग कोहलीलाही मागे टाकत सर्वोच्च स्थान पटकावले आहे.
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही सामन्यांत एकूण २०२ धावा करत शानदार प्रदर्शन केले. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे त्याचा रेटिंग गुणांक ७८१ वर पोहोचला असून तो आता आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. विशेष म्हणजे, क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असतानाच रोहितने आपल्या नावावर हा ऐतिहासिक पराक्रम नोंदवला आहे.
दुसरीकडे, टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी ही रँकिंग निराशाजनक ठरली आहे. मालिकेपूर्वी तो पाचव्या स्थानी होता, मात्र आता एका स्थानाने घसरून सहाव्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत विराटला शून्यावर बाद व्हावे लागले, तर तिसऱ्या सामन्यात त्याने ८१ चेंडूत ७४ धावा केल्या. सध्या विराटकडे ७२५ गुण आहेत. भारतीय क्रिकेटसाठी ही मिश्र भावना घेऊन येणारी बातमी आहे. एकीकडे रोहित शर्माने आपल्या दीर्घ कारकिर्दीला मुकुट चढवला आहे, तर दुसरीकडे विराट कोहलीच्या रँकिंगमध्ये घसरण झाल्याने चाहत्यांमध्ये थोडी खंतही व्यक्त केली जात आहे.