मुंबई,
Madalsa Sharma बॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा करिष्मा आजही चाहत्यांच्या मनात ताजा आहे. एकेकाळी संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्यांची सून, अभिनेत्री मदालसा शर्मा सध्या चर्चेत आहे. रुपाली गांगुलीच्या लोकप्रिय टीव्ही मालिकेत ‘अनुपमा’ मध्ये ‘काव्या’च्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली मदालसा अलीकडेच विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटात झळकली होती. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं साऊथ इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
मदालसा शर्माने खास मुलाखतीत सांगितले की, दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत काम करताना तिला काही अप्रिय अनुभवांना सामोरं जावं लागलं. “मला काही वाईट अनुभव आले... जे मी सहन करू शकले नाही. तिथल्या काही गोष्टी माझ्या स्वभावाच्या विरुद्ध होत्या. म्हणूनच मी साऊथ इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला,” असं ती म्हणाली.जेव्हा तिच्याकडे विचारण्यात आलं की, ती कोणत्या अनुभवाबद्दल बोलत आहे, तेव्हा मदालसाने स्पष्ट केलं, “हो, कास्टिंग काउच आणि अशा काही गोष्टी... मला वाटतं या प्रत्येक इंडस्ट्रीत असतात. पण मला त्या काळात एक प्रसंग अस्वस्थ करणारा वाटला. मी तेव्हा अवघी १७ वर्षांची होते. एका मिटिंगमध्ये मला विचित्र वाटलं आणि तिथून बाहेर पडताना मी स्वतःला म्हटलं – आता परत मुंबईला जाऊया.”
मदालसाने पुढे सांगितले की, ती आपल्या निर्णयांबाबत नेहमीच ठाम असते. “प्रत्येकाचं एक लक्ष्य असतं. पण ते साध्य करण्यासाठी स्वतःची किंमत मोजायची तयारी ठेवावी लागते. माझ्या आयुष्यात मला काय हवं आहे आणि ते कसं मिळवायचं, याचा मी स्वतः विचार करते. काहीही मिळवण्यासाठी स्वतःला हरवणं मला मान्य नाही,” असं ती म्हणाली.
मदालसा शर्माने 2009 मध्ये तेलुगू चित्रपट ‘फिटिंग मास्टर’ मधून अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर ती शौर्य’, आलस्याम अमृतम’, ‘थम्बिकु इंधा ऊरु’, मेम वयासुकु वाचम’, ‘पथयेरम कोडी’, ‘डोव’ आणि ‘सुपर 2’ सारख्या अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्ये झळकली. त्यानंतर राजश्री प्रॉडक्शनच्या ‘सम्राट अँड कंपनी’ सह काही हिंदी चित्रपटांमध्येही ती दिसली.आज ती टीव्ही मालिकांपासून वेबसीरीजपर्यंत सक्रिय असून स्वतःच्या मेहनतीने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करत आहे. साऊथ इंडस्ट्री सोडण्यामागील तिचा प्रामाणिक खुलासा पुन्हा एकदा मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय ठरला आहे.