मार्क झुकरबर्ग का उभारत आहे कुटुंबासाठी आलिशान बंकर!

30 Oct 2025 15:18:18
हवाई,
Mark Zuckerberg's luxurious bunker जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली लोक आता आकाशात नव्हे, तर जमिनीखाली आपली सुरक्षित घरे उभारत आहेत. फेसबुकचे संस्थापक आणि मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग सध्या त्यांच्या हवाई येथील १,४०० एकरच्या आलिशान इस्टेटमुळे चर्चेत आले आहेत. या इस्टेटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त भूमिगत निवारा म्हणजेच बंकर बांधला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या बंकरमध्ये अन्न, पाणी आणि वीज पुरवठ्याची कोणतीही अडचण येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण इस्टेट सहा फूट उंच भिंतीने वेढलेली असून, आत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गोपनीयतेचे कठोर नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. झुकरबर्ग यांनी याला एक ‘लहान तळघर’ म्हटले असले, तरी स्थानिक लोक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमे या ठिकाणाला ‘सुरक्षात्मक बंकर’ असेच संबोधत आहेत. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की, अब्जाधीश नेमके कोणत्या भीतीने अशी तयारी करत आहेत?
 
 

Mark Zuckerberg 
या नव्या ट्रेंडची सुरुवात काही वर्षांपूर्वी लिंक्डइनचे सह-संस्थापक रीड हॉफमन यांनी केली होती. त्यांनी ‘एपोकॅलिप्स इन्शुरन्स’ या संकल्पनेचा उल्लेख केला होता. म्हणजे जगाच्या अंतासारख्या परिस्थितीतही आपले रक्षण करणारे ठिकाण. हॉफमन यांनी याच विचाराने न्यूझीलंडमध्ये सुरक्षित आश्रयस्थान उभारले होते. त्यांच्या पाठोपाठ अनेक टेक दिग्गजांनीही अशा गुप्त बंकरच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. अमेरिकेपासून युरोपपर्यंत अनेक श्रीमंत उद्योजक भविष्यकाळातील संकटांसाठी जमिनीखालील सुरक्षित निवारे तयार करत आहेत.  काहींसाठी ही फक्त सुरक्षिततेची तरतूद आहे, तर काहींसाठी ही मोठी गुंतवणूक ठरत आहे. मात्र या बंकर बांधकामामागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा झपाट्याने होत असलेला विकास.
 
 
ओपनएआयमधील तज्ञांचा विश्वास आहे की आपण लवकरच ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (एजीआय) म्हणजे मानवासारखी बुद्धिमत्ता असलेल्या मशीनच्या युगात प्रवेश करू शकतो. काही अहवालांनुसार, एजीआय सार्वजनिक होण्यापूर्वी ओपनएआयमध्ये आवश्यक कामगारांसाठी निवारे तयार करण्याबाबत चर्चा झाली होती. काही तज्ज्ञांचा अंदाज आहे की एजीआय पुढील ५ ते १० वर्षांत विकसित होऊ शकते, तर काहींचा विश्वास आहे की हे तंत्रज्ञान २०२६ पर्यंतच वास्तवात येऊ शकते. तरीदेखील काही संशोधक या भीतीला निराधार मानतात. तथापि, जगभरातील टेक दिग्गजांकडून वाढत्या बंकर बांधकामाकडे पाहता, हे स्पष्ट होते की भविष्यकाळातील संकटांबाबत मग ते तांत्रिक असो, नैसर्गिक किंवा सामाजिक जगातील सर्वात श्रीमंत लोक आधीच सज्ज होत आहेत.
Powered By Sangraha 9.0