नागपूर,
Nagpur Police Line area, शहरातील टाकळी येथील पोलिस लाईन परिसरातील रस्ते खड्ड्यांनी भरलेले असून नागरिक आणि वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास असूनही रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिसरातील रस्त्यांवर इतके खड्डे पडले आहेत की वाहनचालकांना अनेकदा फुटपाथ किंवा रस्त्याच्या कडेला जावे लागते.

विशेषतः रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडांच्या सावलीमुळे दिवसा हे खड्डे स्पष्ट दिसत नाहीत, तर पावसाळ्यात ते अधिक धोकादायक ठरतात. अनेकदा वाहन रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. या खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून, चालकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे, तरी संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. जमात-ए-इस्लामी हिंद, नागपूर चे मीडिया सेक्रेटरी डॉ. एम. ए. रशीद यांनी प्रशासनाकडे या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “रस्त्यांचे योग्य डांबरीकरण तसेच पावसाचे पाणी नाल्याद्वारे वाहून जाण्याची ड्रेनेज व्यवस्था आवश्यक आहे, जेणेकरून नागरिकांना भविष्यातील त्रास आणि अपघातांपासून बचाव करता येईल.” नागपूर पोलिस लाईन परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांकडून आता रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी अधिक जोर धरत आहे.