कुशीनगर,
nitish-katara-murder उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या रस्ते अपघातात नितीश कटारा हत्याकांडातील दोषी सुखदेव यादव उर्फ पहेलवान (वय ५५) याचा मृत्यू झाला. हा अपघात फाझिलनगर शहरातील बाघौचघाट वळणावर रात्री सुमारे १० वाजता घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव यादव आपल्या दोन मित्रांसोबत विजय गुप्ता (४५) आणि भागवत सिंग (५०) एका नातेवाईकाच्या घरी गेले होते. रात्री परतताना, एका वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने त्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. nitish-katara-murder धडक एवढी भीषण होती की तिन्ही जण रस्त्यावर फेकले गेले. सुखदेवचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर स्कॉर्पिओ दुभाजकाला धडकली असून, पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. फाझिलनगर पोलिस ठाण्याचे प्रमुख माधुर्य ब्रह्मा उपाध्याय यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तपास सुरू आहे. वाहनाचे मालक व चालक यांचा शोध घेतला जात आहे. सुखदेव यादव हा २००२ मधील नितीश कटारा हत्याकांडात दोषी ठरलेला सहआरोपी होता. दिल्लीतील लग्नसमारंभातून नितीश कटारा यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात माजी मंत्री डी.पी. यादव यांचा मुलगा विकास यादव आणि त्याचा चुलतभाऊ विशाल यादव यांना २५ वर्षांची शिक्षा, तर सुखदेव यादवला २० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. चार महिन्यांपूर्वीच सुखदेव यादव तुरुंगातून सुटून घरी परतला होता. परंतु मंगळवारी झालेल्या या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने या चर्चित हत्याकांडाशी संबंधित आणखी एक पान बंद झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, अपघाताचा प्राथमिक तपास निष्काळजी वाहनचालकामुळे झाल्याचा आहे. अधिक तपास सुरू असून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.