तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
Pandharkawda municipal election पांढरकवडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. प्रभाग 9 मधील अनेक रहिवाशांची नावे चुकीने प्रभाग 10 मध्ये टाकण्यात आल्याने स्थानिक मतदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.या संदर्भात प्रभाग 9 मधील रहिवासी अंकित नैताम यांनी नगर परिषद मुख्याधिकारी व राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आम्ही नियमानुसार आक्षेप नोंदवला. मात्र तो पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आला. मतदार यादीतील चुकांवर कोणतीही सुनावणी न घेता थेट अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
एकाच गल्लीत दोन प्रभाग : नागरिकांमध्ये गोंधळ
नैताम यांच्या मते, एकाच गल्लीत व रस्त्यावर असलेल्या घरांपैकी काहींची नावे प्रभाग 9 मध्ये, तर शेजारच्या घरांची नावे प्रभाग 10 मध्ये समाविष्ट केली गेली आहेत. आमचे घर, वास्तव्य आणि मालमत्ता प्रभाग 9 मध्ये असूनही माझे व माझ्या कुटुंबियांची नावे प्रभाग 10 मध्ये दाखविण्यात आली आहेत. हे पूर्णपणे अधिकाèयांच्या दुर्लक्षाचे द्योतक आहे, असे नैताम यांनी सांगितले.
कायद्याचे उल्लंघन : आयोगाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष
राज्य निवडणूक आयोगाच्या नगर परिषद व नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाविषयी मार्गदर्शक सूचना मधील कलम 9 (1), 11 (2) आणि 13 (1) तसेच महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 च्या कलम 10 (2) चा सरळ भंग झाल्याचा आरोप नैताम यांनी केला आहे. हे प्रकरण केवळ प्रशासकीय त्रुटी नसून, मतदारांच्या हक्कावर गदा आणणारे आहे, असा आरोप त्यांनी केला.
उच्च न्यायालयात जाण्याची तयारी
या प्रकरणाची दखल न घेतल्यास नैताम यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, आमच्या तक्रारीवर कारवाई झाली नाही, तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संविधानाच्या कलम 226 अंतर्गत याचिका दाखल करू. प्रशासनावर सर्व जबाबदारी राहील.
नागरिकांची मागणी : तातडीने चौकशी करा
स्थानिक नागरिकांनी निवडणूक आयोगाला तातडीने चौकशी करून प्रभाग रचना व मतदार यादीतील तफावत दूर करण्याची मागणी केली आहे. मतदारांच्या अधिकारांशी खेळ करणे अमान्य आहे; पारदर्शक व न्याय्य मतदार यादी हीच लोकशाहीची पायरी आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.