बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी पोलिस अधिकाऱ्याची हत्या!

30 Oct 2025 12:43:08
सिवान,
बिहारमध्ये निवडणुकीपूर्वीच सिवान जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरौंडा पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) अनिरुद्ध कुमार यांची बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी निर्घृण हत्या केली. धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली असून, त्यांचा मृतदेह पोलिस स्टेशनपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या राहार परिसरातील शेतात सापडला. त एएसआय अनिरुद्ध कुमार (वय ४६) हे मधुबनी जिल्ह्यातील राजपार पोलिस स्टेशन परिसरातील कुंवर गावचे रहिवासी होते. ते सुमारे दीड वर्षांपासून दरौंडा पोलिस स्टेशनवर कार्यरत होते.
 

Police officer murdered in Bihar 
घटनेची माहिती मिळताच सिवानचे पोलिस अधीक्षक (एसपी) मनोज कुमार तिवारी, एसडीपीओ अमन आणि दरौंडा तसेच महाराजगंज पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाचा धागा पकडत परिसरातील एका ऑर्केस्ट्रा ऑपरेटरच्या निवासस्थानी छापा टाकला. तिथून तीन ते चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, जेणेकरून कोणताही तणाव निर्माण होऊ नये.
 
 
एसपी मनोज कुमार तिवारी यांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले की, ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याची शक्यता आहे. स्थानिकांच्या मते, एएसआय अनिरुद्ध कुमार यांचे एका ऑर्केस्ट्रा मंडळातील नर्तकीशी संबंध होते, आणि त्यातूनच या खुनाची पार्श्वभूमी तयार झाल्याची चर्चा आहे. पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास विविध कोनातून करत असून, आरोपींचा लवकरच शोध लागेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेने संपूर्ण सिवान जिल्हा हादरला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना प्रशासनासाठी मोठी चिंता ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0