सोलापूर,
Praniti Shinde is a traitor सोलापुरात महाविकास आघाडीत पुन्हा वादाचे वारे वाहू लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमध्ये उघडपणे मतभेद दिसू लागले आहेत. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार शब्दांत हल्लाबोल करत, “त्या आमच्यासाठी चिल्लर आहेत” असा संतप्त आरोप केला आहे.
शरद कोळी यांनी म्हटलं की, “विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रणिती शिंदे यांनी गद्दारी केली होती. अशा व्यक्तीसोबत आम्ही कोणतीही युती करणार नाही. आघाडी तुटली तरी चालेल, पण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं नाही.” त्यांनी पुढे टीका करत म्हटलं की, उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश न पाळता प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीचा धर्मच मोडला. विरोधकांशी हातमिळवणी करून त्यांनी आघाडीला गाळात घातलं.
कोळी यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर वैयक्तिक टीका करत सांगितलं की, “उद्धव ठाकरे साहेबांसमोर मतासाठी झोळी पसरवून खासदार झालेल्या प्रणिती शिंदे आज मोठेपणा दाखवतात. पण त्यांना हे लक्षात नाही की, त्या शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे खासदार बनल्या.” त्यांनी पुढे सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी स्वतः शिंदेंना सांगितलं होतं की, शिवसेनेमुळे तुम्ही खासदार झाल्या आहात, त्यामुळे आघाडीचा धर्म पाळा. पण त्यांनी तो आदेश मानला नाही. त्यामुळे त्या आमच्यासाठी चिल्लर आहेत.
शरद कोळी यांनी स्पष्ट केलं की, ठाकरे गटाला काँग्रेससोबत आघाडी करण्यास हरकत नाही, मात्र प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास आम्ही तयार नाही. त्यांच्या या विधानामुळे सोलापुरात काँग्रेस आणि ठाकरे गटातील तणाव अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.