return on Halloween दरवर्षी ३१ ऑक्टोबरच्या रात्री जगभरात एक वेगळाच उत्सव साजरा केला जातो. हॅलोविन. या दिवसाची ओळख ‘ऑल हॅलोज इव्ह’ किंवा ‘ऑल सेंट्स डे’च्या आदल्या रात्रीशी जोडली जाते. पण या सणामागची कथा हजारो वर्षे जुनी आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी युरोपमधील सेल्टिक समुदायांमध्ये ‘समहेन’ नावाचा सण साजरा केला जात असे. त्यांच्या मते, ३१ ऑक्टोबरच्या रात्री जिवंत आणि मृतांच्या जगामधील भिंत सर्वात पातळ होते आणि त्यामुळे मृत आत्मे पृथ्वीवर परत येतात. या श्रद्धेमुळे लोक त्या रात्री शेकोट्या पेटवत, मुखवटे घालत आणि आत्म्यांना शांत करण्यासाठी अन्न ठेवतात.
संग्रहित फोटो
नंतर ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाल्यानंतर १ नोव्हेंबरला ऑल सेंट्स डे जाहीर करण्यात आला, आणि त्याच्या आदल्या रात्रीचा सण ‘ऑल हॅलोज इव्ह’ म्हणून ओळखला जाऊ लागला. हाच कालांतराने हॅलोविन झाला. काळाच्या ओघात हा सण भीती आणि अंधश्रद्धेच्या चौकटीतून बाहेर पडून उत्सव, सर्जनशीलता आणि स्वतःच्या अभिव्यक्तीचे प्रतीक बनला. आज हॅलोविन ही केवळ भीतीची रात्र नसून कल्पकतेचा आणि व्यक्तिमत्वाचा उत्सव आहे. लोक स्वतःच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये सजतात — काही भितीदायक, काही विनोदी, तर काही अगदी कल्पनारम्य. मुखवटे, पोशाख आणि सजावट यांच्या माध्यमातून लोक भीतीवर मात करण्याची आणि स्वतःला नव्याने व्यक्त करण्याची संधी घेतात.
भारतामध्ये जरी हा सण पारंपारिक नसला तरी गेल्या काही वर्षांत त्याचे आकर्षण झपाट्याने वाढले आहे. हॉलिवूड चित्रपट, सोशल मीडिया आणि जागतिक फॅशन ट्रेंड्समुळे विशेषतः जनरेशन Z आणि तरुण वर्गात हॅलोविन लोकप्रिय झाला आहे. महानगरांतील कॅफे, ऑफिसेस आणि कॉलेजेस आता हॅलोविन थीमने सजवले जातात. लोक कॉस्च्युम पार्टीज, ‘ट्रिक ऑर ट्रीट’ खेळ आणि ‘स्पूकी मेकअप चॅलेंजेस’चा आनंद घेतात. ब्रँड्ससाठीही हा दिवस एक मोठी संधी ठरतो आहे. फूड ब्रँड्स पंपकिन-थीम्ड पदार्थ सादर करतात, फॅशन ब्रँड्स डार्क ग्लॅम कलेक्शन लाँच करतात, आणि टेक कंपन्या घोस्ट फिल्टर्सद्वारे डिजिटल मजा वाढवतात.
टीप- वरील बातमी केवळ वाचकांची आवड लक्षात घेऊन देण्यात येत आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.