रस्त्याचे काम प्रामाणिकपणे कराः डॉ. उईके

30 Oct 2025 19:17:31
चंद्रपूर, 
Ashok Uike : भद्रावती तालुक्यातील शेगाव(खु.)-चंदनखेडा-मुधोली-मोहर्ली हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने गावकर्‍यांसाठी तर महत्वाचा आहेच. मात्र, ताडोबात येणार्‍या देश-विदेशातील पर्यटकांसाठीसुध्दा सोयीचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या रुंदीकरणाला व सुशोभिकरणाला मंजुरी दिली. जनतेच्या सोयीसाठी असलेल्या या रस्त्याचे काम प्रामाणिकपणे करून रस्त्याची गुणवत्ता व दर्जा उत्कृष्ट राखा, अशा सुचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.
 
 
 
UIKE
 
 
बुधवारी शेगाव (खु.) येथे रस्त्याच्या रुंदीकरण कामाचे भुमिपुजन करताना ते बोलत होते. यावेळी खा. प्रतिभा धानोरकर, आ. करण देवतळे, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर, सरपंच मोहित लभाणे आदी उपस्थित होते.
 
 
डॉ. उईके म्हणाले, शेगाव-चंदनखेडा-मुधोली-मोहर्ली या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. तसेच याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. आता राज्य शासनाने या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. गावकर्‍यांसाठी अतिशय उपयोगी असलेल्या या रस्त्याचे बांधकाम अतिशय गुणवत्तापुर्वक व दर्जेदार व्हायला पाहिजे. रस्त्याबाबत कोणतीही तक्रार येऊ देवू नका. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामावर नियमितपणे लक्ष ठेवावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. तत्पूर्वी, पालकमंत्र्याच्या हस्ते कुदळ मारून रस्त्याच्या बांधकामाचे भुमिपूजन करण्यात आले.
 
 
खा. धानोरकर यांनी, राज्य शासनाने बजेटमधून भद्रावती तालुक्यात हे काम मंजूर केले आहे. अनेक गावे आणि ग्रामपंचायती या रस्त्यावर असून, दळणवळणासाठी हा रस्ता अतिशय महत्वाचा असल्याचे सांगितले. शेगाव, चंदनखेडा, मोहर्ली, जुनोना, कोलारा गेटकरीता हा रस्ता सोयीस्कर आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी अतिशय चांगले काम करावे, असेही त्या म्हणाल्या.
 
 
आ. करण देवतळे म्हणाले, या अर्थसंकल्पात संपूर्ण राज्यात 15 रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली. यात नागपूर विभागातून केवळ भद्रावती तालुक्यातील शेगाव, चंदनखेडा, मुधोली या रस्त्याचा समावेश करण्यात आला. यासाठी पालकमंत्री डॉ. उईके यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या रस्त्याने अनेक पर्यटक ताडोबाला येत असतात. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण आवश्यकच होते. अधिकार्‍यांनी रस्त्याच्या कामाची गती ठेवून दर्जेदार काम करावे, असे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0