रोहतक,
Rohtak College News हरियाणातील महर्षी दयानंद विद्यापीठात (एमडीयू) घडलेल्या एका अमानवीय प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. विद्यापीठातील स्वच्छता विभागातील चार महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुरुष पर्यवेक्षकाने “मासिक पाळीचा पुरावा” मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महिलांना त्यांचे कपडे काढून सॅनिटरी पॅड दाखवायला भाग पाडण्यात आले, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली, जेव्हा हरियाणाचे राज्यपाल प्रो. असीम कुमार घोष एमडीयूच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी स्वच्छता पर्यवेक्षक विनोद कुमार यांनी चार महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामावर उशिरा येण्याबद्दल फटकारले.

महिलांनी उशिराचे कारण “मासिक पाळीचा त्रास” असे सांगितल्यावर, पर्यवेक्षकाने त्यांच्याकडून याचा पुरावा मागितला. केवळ एवढेच नव्हे, तर त्याने दुसऱ्या महिला कर्मचाऱ्यांना बोलावून संबंधित महिलांची “तपासणी” करण्याचे निर्देश दिले. या अमानवीय वर्तनामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ कारवाई करत स्वच्छता पर्यवेक्षक विनोद कुमार, वितेंदर कुमार आणि आणखी एका कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे हरियाणा राज्य महिला आयोगाकडे पाठवले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी या घटनेला “गंभीर आणि लज्जास्पद” म्हणत विद्यापीठ प्रशासन आणि रोहतक पोलिस अधीक्षकांना पाच दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
एमडीयूचे कुलगुरू प्रा. राजबीर सिंग यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत सांगितले की, विद्यापीठाचे “शून्य सहिष्णुता धोरण” आहे आणि अशा प्रकारच्या लैंगिक छळाच्या कृत्यांना कोणतीही माफी नाही. पोलिसांनी या प्रकरणात पर्यवेक्षक विनोद कुमार, वितेंदर कुमार आणि सुंदर लाल या तिघांविरुद्ध लैंगिक छळासह गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे. या घटनेमुळे एमडीयू प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महिला कर्मचाऱ्यांचा अपमान करणाऱ्या या अमानवीय घटनेविरुद्ध समाजातील विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.