नवी दिल्ली,
Starlink Satellite Internet in India एलन मस्क भारतात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या स्पेसएक्स समूहाच्या मालकीची स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी लवकरच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. यामुळे देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागांपर्यंत वेगवान इंटरनेट पोहोचण्याची नवी दारे खुली होतील. मुंबईच्या चांदिवली परिसरात स्टारलिंकने सुमारे १,२९४ चौरस फूट ऑफिस स्पेस पाच वर्षांच्या करारावर ₹२.३३ कोटींना भाड्याने घेतली असून, ही एलन मस्क यांच्या कंपनीची भारतातील पहिली अधिकृत पायरी मानली जात आहे.
संग्रहित फोटो
स्टारलिंकने ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत तांत्रिक आणि सुरक्षा डेमो रन आयोजित करण्याची योजना आखली आहे. या डेमोमध्ये त्यांच्या उपग्रहाद्वारे चालणाऱ्या हाय-स्पीड इंटरनेट नेटवर्कची क्षमता दाखवली जाणार आहे. या प्रात्यक्षिकानंतर भारतात स्टारलिंकचे व्यावसायिक लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कंपनी सरकारकडून अंतिम मंजुरी आणि स्पेक्ट्रम वाटपाची प्रतीक्षा करत आहे. दूरसंचार तज्ज्ञांच्या मते, स्टारलिंकच्या आगमनामुळे भारतातील सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण होईल. ग्रामीण भागांमध्ये ब्रॉडबँड प्रवेश वाढेल आणि इंटरनेटची गुणवत्ता तसेच गती सुधारेल.

स्टारलिंक सध्या जगभरातील १५० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे आणि ७ दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांना कमी-लेटन्सी आणि उच्च-गती इंटरनेट सेवा पुरवते. ही सेवा केवळ शहरांपुरती मर्यादित नसून जहाजे, विमान आणि दुर्गम डोंगराळ भागांमध्येही उपलब्ध आहे. जगभरातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त प्रदेशांमध्ये स्टारलिंकची सेवा अत्यंत उपयुक्त ठरली आहे, जिथे पारंपरिक नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाले होते. अशाच प्रकारे भारतातही ही सेवा ग्रामीण भाग आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी क्रांतिकारी ठरू शकते.
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान स्टारलिंकच्या सेवेच्या किंमतींचा अंतिम निर्णय घेणार आहे. दरम्यान, कंपनीने आवश्यक गेटवे सेटअपची उभारणी केली असून, दूरसंचार विभाग आणि IN-SPACe कडून आवश्यक मंजुरी देखील मिळाल्या आहेत. एलोन मस्क यांची स्टारलिंक सेवा भारतात सुरू झाल्यास, ती ग्रामीण आणि दुर्गम भागातील डिजिटल दरी भरून काढणारी ठरेल आणि इंटरनेट क्रांतीच्या नव्या अध्यायाची सुरुवात भारतातून होईल.