पुणे,
Sunilji Raut passes away राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सिंहगड भागाचे संघचालक सुनीलजी मधुकरराव राऊत (वय ६९) यांचे गुरुवारी (दि. ३० ऑक्टोबर) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने संघ परिवारात आणि सामाजिक कार्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई आणि नात असा परिवार आहे.
१९६४ पासून संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक असलेले सुनीलजी राऊत यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण संघकार्याला अर्पण केला. व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेल्या राऊत यांनी सुरुवातीला काही काळ नोकरी केली, त्यानंतर यशस्वी उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी काही वर्षे परदेशातही काम करताना संघाच्या विचाराशी नाळ जोडलेली ठेवली. संघाचे तृतीय वर्ष शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात तीन वर्षे प्रचारक म्हणून पूर्णवेळ कार्य केले होते.
संघाच्या सिंहगड भागाचे संघचालक म्हणून ते जबाबदारी सांभाळत होते. तसेच त्यांनी ‘कौशिक आश्रम’ आणि ‘अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले. समाजातील समरसता, सेवा आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. याशिवाय त्यांनी पर्वती भाग बौद्धिक प्रमुख, पर्वती भाग सहकार्यवाह, सिंहगड भाग समरसता गतीविधी प्रमुख अशा विविध पदांवरही उल्लेखनीय जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांनी सलग चार वर्षे विवेकानंद नगर संघचालक म्हणून संघ कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पुण्यात आयोजित ‘शिवशक्ती संगम’ या महत्त्वपूर्ण उपक्रमातही त्यांच्यावर ‘सिद्धांत केंद्र प्रमुख’ अशी जबाबदारी सोपवण्यात आली होती, जी त्यांनी अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडली.
सुनीलजी राऊत यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी संघाचे महानगर संघचालक रवींद्रजी वंजारवाडकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रसाद लवळेकर, प्रा. हर्षवर्धन खरे, मुकुंद रणपिसे (सेनादत्त सहकारी संस्था व नवचैतन्य क्रीडा संघ) तसेच राऊत कुटुंबीयांच्या वतीने महेश रोकडे यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.