‘गांधीगीरी’च्या मार्गाने वाहतूक जनजागृती

30 Oct 2025 18:52:55
नागपूर,
traffic awareness वाहतूक शिस्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनआक्रोश या सामाजिक संस्थेने बुधवारी सीताबर्डी येथील व्हेरायटी चौकात ‘गांधीगीरी’च्या अनोख्या पद्धतीने जनजागृती केली. सिग्नल तोडणारे किंवा हेल्मेट न घालणारे वाहनचालक यांना ‘आम्ही वाहतुकीचे नियम पाळतो... तुम्ही पण पाळा...’ असे लिहिलेले फलक देऊन त्यांनी विनम्रतेने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
 
 

ट्रॅफिक  
 
 
या उपक्रमात जनआक्रोशचे सुमारे ३० स्वयंसेवक सहभागी झाले होते. नेहमीप्रमाणे पिवळ्या टी-शर्टमध्ये सिग्नलवर उभे राहून वाहतूक व्यवस्था सांभाळणारे हे स्वयंसेवक यावेळी ‘गांधीवादी’ पद्धतीने संदेश देताना दिसले. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड न करता त्यांच्या हातातच संदेशफलक देऊन त्यांनी आत्मचिंतनाची संधी उपलब्ध करून दिली. संस्थेचे सचिव रविंद्र कासखेडीकर म्हणाले, “लोकांना एखादी गोष्ट करू नका म्हटले की ते उलट करतात. म्हणून आम्ही आमचा दृष्टिकोन बदलला. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा वापर करून आम्ही लोकांना जबाबदारीची जाणीव करून देत आहोत. वाहनचालक याला शिक्षा मानत नाहीत, तर सुधारण्याची संधी म्हणून स्वीकारतात.” कासखेडीकर यांनी पुढे सांगितले, “पोलीस विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ आहे. त्यांना दंड आकारणी आणि कागदपत्रांच्या कामात वेळ जातो. आम्ही समाजाच्या नजरेतून सकारात्मक परिवर्तन घडवू इच्छितो. आत्म-साक्षात्काराद्वारे नियमांचे पालन घडवणे हा यामागचा उद्देश आहे.” या मोहिमेला वाहनचालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ३० ते ४० जणांनी ‘गांधीगीरी’च्या या संदेशमोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.
Powered By Sangraha 9.0