धर्मांतराच्या वादात अडकले वडील, संघातून बाहेर पडली जेमिमा

31 Oct 2025 13:06:22

नवी दिल्ली,

jemima-rodrigues महिला विश्वकपच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३३९ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना जेमिमा रॉड्रिग्सने नाबाद १२७ धावा ठोकत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हा सामना केवळ तिच्या फलंदाजीचा नव्हता, तर संघर्ष, अश्रू आणि आत्मविश्वासाचा प्रवास होता.
 
 
jemima-rodrigues

जेमिमाचा प्रवास क्रिकेटपासून नव्हे, तर हॉकीपासून सुरू झाला. ती महाराष्ट्र अंडर-१७ आणि अंडर-१९ हॉकी संघात खेळली होती. सकाळी हॉकीची सराव सत्र आणि दुपारी क्रिकेट – असा तिचा दिनक्रम होता. गुडघ्यांना दुखापत झाली, तरी ती थांबली नाही. शेवटी तिला आपलं खरं प्रेम क्रिकेटमध्ये सापडले. jemima-rodrigues तिचे वडिल इव्हान रॉड्रिग्स यांनी मुलीसाठी शाळेत मुलींचा क्रिकेट संघ सुरू केला. संपूर्ण कुटुंबाने तिला प्रोत्साहन दिले. भांडुपमधून बांद्र्यात स्थलांतर केले, जेणेकरून चांगल्या सुविधा मिळू शकतील. घराच्या छोट्याशा अंगणात नेट्स बसवण्यात आले आणि चेंडूच्या आवाजासोबत जेमिमाने आपलं स्वप्न घडवले. १६ वर्षांची असताना तिने तब्बल २०२ धावा झळकावल्या. त्याच दिवशी तिची परीक्षा होती, पण खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी तीने अत्यंत शिस्तीने सांभाळल्या. मागील वर्षी ती उत्तम फॉर्ममध्ये असूनही विश्वकप संघातून बाहेर करण्यात आली. अनेक रात्री ती शांतपणे रडली, पण हार मानली नाही. उपांत्यपूर्व सामन्यातसुद्धा तिला बाकावर बसवण्यात आलं, मात्र त्या दुःखाचं रूपांतर तिने उर्जेत केलं. मैदानावर तिचं शांत चेहरा होता, पण अंतर्मनात प्रचंड वादळ होते.

दरम्यान, तिच्या वडिलांवर धर्मांतराशी संबंधित आरोप झाले. खार जिमखान्यात धार्मिक कार्यक्रम घेतल्याचा काही सदस्यांनी आक्षेप घेतला. या वादामुळे कुटुंबावर ताण आला, पण जेमिमाने हे संकट स्वतःवर हावी होऊ दिलं नाही. तिच्या डोळ्यांत पाणी असलं तरी हातातला बॅट तिचं उत्तर देत होता. ती संघातील सर्वात आनंदी सदस्यांपैकी एक आहे – गिटार वाजवते, गाणी गाते, सर्वांना हसवते. पण रात्री ती एकटी असते, स्वप्नांशी झुंजते. jemima-rodrigues सकाळ होताच पुन्हा हातात बॅट घेऊन मैदानावर उतरते. डेब्यूपूर्वी तिची सचिन तेंडुलकर यांच्याशी झालेली चर्चा आजही तिच्या लक्षात आहे. तिने घाबरल्याचं सांगितलं तेव्हा सचिन म्हणाले, “घाबरणं म्हणजे तू खेळावर प्रेम करतेस.” त्या दिवसानंतर तिचा भीतीवर विजय मिळवण्याचा प्रवास सुरू झाला.

ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी इतिहास घडवावा लागणार होता. जेमिमा क्रीजवर आली, स्मितहास्य करत प्रत्येक फटका मारला — स्ट्रेट ड्राइव्ह, लेग फ्लिक आणि आत्मविश्वासानं भरलेले शॉट्स. १२७ नाबाद धावांसह तिने भारताला अंतिम फेरीत पोहोचवले. शेवटच्या ओव्हरमध्ये तिने डोळे मिटले, एक खोल श्वास घेतला आणि चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवले. त्याच क्षणी भारत विजयी झाला — आणि जेमिमा रॉड्रिग्स देशाच्या हृदयात ‘वीरांगना’ बनून उभी राहिली.

Powered By Sangraha 9.0