चिखली
Atul Jog : संघाची शाखा चारित्र्य निर्माणाचे केंद्र आहे. दैनंदिन शाखेच्या माध्यमातून समाज संघटनेचे कार्य संघ गत शंभर वर्षांपासून करीत आहे. समरसता, पर्यावरणपूरक जीवनशैली, कुटुंब प्रबोधन, स्वबोध, नागरी कर्तव्य या पंचपरिवर्तनाद्वारे सशक्त समाज निर्मितीसाठी शताब्दी वर्षात संघ जनजागरण करणार असल्याचे मत वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटनमंत्री अतुल योग यांनी व्यक्त केले. ते शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी येथील तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित चिखली नगराच्या विजयादशमी उत्सवात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी प्रवीण पडघान, विभाग संघचालक चित्तरंजन राठी, नगर कार्यवाह मिलिंद हिवाळे यांची उपस्थिती होती.

संघाच्या माध्यमातून प्रारंभापासूनच सज्जन शक्तीच्या संघटनेचे कार्य सुरू आहे. तर विविध कार्यक्रम उपक्रमांद्वारे वंचित, शोषित, पीडित समाजाला बळ देण्यात येते. ऐवढेचे नव्हे तर हा समाज राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे काम देखील संघ करीत आहे. गत शंभर वर्षात अनेक अडचणींवर मात करून संघ काम सुरूच आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने देशातील सर्व गाव-खेड्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार स्वयंसेवकांचा आहे. तर देशाच्या सर्वांगीण विकासाच्या या प्रयत्नात प्रत्येकाचा सहभाग असावा असाही प्रयत्न केला जाणार असल्याचे अतुल जोग म्हणाले. यावेळी प्रमुख अतिथी प्रवीण पडघान म्हणाले की, सेवा, समर्पण आणि त्याग यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.संघाची शाखा हे समाज घडवण्याचे माध्यम आहे. प्रारंभी विभाग संघचालक चित्तरंजन राठी यांनी प्रमुख अतिथी प्रवीण पडघान यांचे स्वागत केले.
ध्वजारोहण, प्रार्थना, शस्त्रपूजनानंतर प्रत्युत प्रचलनम , घोष वादन, विविध प्रकारचे प्रात्यक्षिक, सांघिक गीत, सुभाषित, अमृतवचन, वैयक्तिक गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय व आभार नगर कार्यवाह मिलिंद हिवाळे यांनी केले.
उत्सवाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.