बुलढाणा,
Buldhana municipal election, बुलढाणा नगर परिषद निवडणुकीची राजकीय हालचालीना वेग आला आहे. नगर परिषद प्रशासनाने अंतिम प्रभाग रचनेचा आराखडा ३० सप्टेंबर रोजी सार्वजनिक केला आहे. या अंतिम रचनेनंतर आता सर्व राजकीय पक्ष नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बुलढाणा प्रभाग रचनेवर भाजपा तसेच महाविकास आघाडीच्या आक्षेपांची दखल घेत प्रभाग रचनेत बदल करण्यात आला आहे.
प्रभागातील लॅन्डमार्कही समाविष्ट करत चुकीच्या पद्धतीने रचनेची केलेली सुरूवात दुरुस्त करण्यात आली आहे. अशा पद्धतीची दुरुस्ती केवळ बुलढाण्यातच करण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच प्रभाग ५ व ८ च्या रचनेत बदल करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी बुलढाणा वतीने जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे शहराध्यक्ष मंदार बाहेकर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, माजी नगरसेवक अरविंद होंडे, भाजप नेते पद्मनाभ बाहेकर निलेश खडके यांनी रीतसर आक्षेप नोंदवले होते व त्याच्या लेखी जबाब प्रभाग रचने संदर्भातील आक्षेप व हरकती त्यामध्ये नमूद करून नियमानुसार प्रभाग रचनेमध्ये बदल करण्याचे विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती त्यानुसार प्रभाग क्रमांक ५ व प्रभाग क्रमांक ८ मध्ये बदल करण्यात आलेला आहे. प्रभाग रचनेमध्ये दिशांची व्याप्ती निर्देशित करत असताना प्रभागांची दिशा ही उत्तरेकडून सुरुवात होत असताना काही प्रभागांच्या दिशा ह्या दिशा निर्देशांप्रमाणे दिसून आल्या नाहीत त्यामध्येही बदल करण्यात आलेला आहे तसेच प्रभाग निहाय प्रभागाची व्याप्ती जसे की त्या प्रभागामध्ये कोण-कोणते नगर, विशिष्ट स्थळे, धार्मिक स्थळे या प्रकारची विशिष्ट ठिकाणी असणे अपेक्षित असते त्या प्रकारचा तक्ताही भाजपच्या मागणीनुसार अनुसूची मध्ये समाविष्ट करण्यात आला
१९ ऑगस्ट रोजी बुलढाणा नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत या जाहीर प्रभाग रचनेवर आक्षेप व सूचना नोंदविण्यात आल्या. १ ते ८ सप्टेंबर दरम्यान या आक्षेपांची सुनावणी झाली व अखेर ३० सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना घोषित करण्यात आली. नगर परिषद बुलढाणा येथे यापूर्वी २८ सदस्य आणि ३ सहनियुक्त सदस्य असे मिळून एकूण ३१ नगरसेवक होते. मात्र शहराच्या वाढत्या लोकसंख्येला अनुसरून या वर्षी एका प्रभागाची वाढ करण्यात आली असून त्यानुसार दोन सदस्य वाढले आहेत. यानंतर आता नगर परिषदेत एकूण १५ प्रभाग असतील आणि ३० नगरसेवक निवडून येतील. दीर्घकाळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रतीक्षा सामान्य नागरिकांपासून राजकीय पक्षाचे इच्छूक उमेदवार करीत आहे. राज्यातील नगर परीषद नगर पंचायत नगराध्यक्ष पदाची सोडत ६ ऑक्टोंबर रोजी मंत्रालय येथे काढण्यात बाबतचे आदेश राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुळकर्णी छापवाले यांनी दिला आहे. त्यामुळे नगरध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या सर्व पक्षाच्या उमेदवारांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.