video '500 रुपयांसाठी डिलिव्हरी बॉयचा अजब कारनामा' !

04 Oct 2025 12:43:16
नवी दिल्ली,
delivery boy demands bribe सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून, यामध्ये Flipkart कंपनीचा एक डिलिव्हरी बॉय मोबाईल एक्सचेंज दरम्यान ग्राहकाकडे ५०० रुपये मागताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, ग्राहकाने जुन्या मोबाईलचा एक्सचेंज करताना जेव्हा तो फोन डिलिव्हरी बॉयकडे सुपूर्द करतो, तेव्हा तो मोबाईलमध्ये "खराबी" असल्याचे कारण देत एक्सचेंज प्रक्रिया पुढे नेण्यासाठी ५०० रुपयांची मागणी करतो. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्राहकाने त्याला पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्वरित निघून जाण्यास सांगितले.
 
 

 
सदर व्हिडीओमध्ये दिसत आहे की, डिलिव्हरी एजंट ग्राहकाला धमकी देतो की, जर पैसे दिले नाहीत तर तो नव्या फोनवर "डेंट" मारेल. ग्राहकाने यावर तीव्र प्रतिक्रिया देत त्याला थेट सुनावले की, "फोन डिलिव्हर कर आणि ड्रामा करू नकोस." या संपूर्ण प्रकारानंतर एजंट पैसे न घेताच तिथून निघून जातो.
 
 
व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @ayushdxt या युजरने शेअर केला असून, तो झपाट्याने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नागरिकांनी आपले अनुभव शेअर करत Flipkart डिलिव्हरी एजंट्सच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेकांनी सांगितले की, अशा प्रकारची फसवणूक त्यांच्यासोबतही झाली आहे, जिथे डिलिव्हरी बॉय मोबाईलमध्ये खोटे दोष दाखवून पैसे मागतो आणि पैसे दिल्यास चांगली रिपोर्ट तयार करून एक्सचेंज प्रोसेस पूर्ण करतो.काही ग्राहकांनी भीतीपोटी पैसे दिल्याची कबुली दिली आहे, तर काहींनी अशा वेळी ऑर्डर रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. यावर Flipkart कंपनीनेही लक्ष दिले असून, त्यांनी व्हायरल पोस्टवर उत्तर देत म्हटले आहे की, "आम्ही तुमची चिंता समजून घेतली आहे आणि तुमच्या डायरेक्ट मेसेजला उत्तर दिले आहे. कृपया एकदा तपासा. आणखी काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधा. आम्हाला तुमची मदत करण्यात आनंद होईल."
 
 
 
 
 
 
या प्रकारामुळे Flipkart कंपनीच्या डिलिव्हरी नेटवर्कबाबत सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली आहे. ग्राहकांनी मागणी केली आहे की, कंपनीने आपल्या डिलिव्हरी एजंट्सवर नियंत्रण ठेवावे आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा घालावा. मोबाईल एक्सचेंजसारख्या सेवेचा गैरवापर करून ग्राहकांची फसवणूक होणे ही चिंतेची बाब आहे, असेही अनेकांनी नमूद केले.Flipkart कडून याप्रकरणी अधिकृत तपास सुरू असल्याचे संकेत मिळाले असून, संबंधित एजंटवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0