'बळीराजाची' कमाल केबीसीवर पटकावले ५० लाखांचे बक्षीस

04 Oct 2025 17:26:12
छत्रपती संभाजीनगर,
Kailas Kuntewad KBC  "मनात आशा असेल, तर वाट सापडतेच" – हेच खरं करून दाखवलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बालानगर गावातील कैलास रामभाऊ कुंटेवाड यांनी. ‘कौन बनेगा करोड़पति’ या लोकप्रिय ज्ञानस्पर्धेच्या मंचावर आपल्या सामान्य ज्ञानाचं दर्शन घडवत कैलास यांनी तब्बल ५० लाख रुपयांचं बक्षीस  जिंकून संपूर्ण जिल्ह्याचं नाव उज्वल केलं आहे.
 

Kailas Kuntewad KBC  
एका अत्यंत सामान्य, गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले कैलास यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर ‘केबीसी’च्या हॉटसीटपर्यंतचा प्रवास केला. यासाठी त्यांनी तब्बल सहा वेळा प्रयत्न केले आणि अखेर यंदाच्या पर्वात त्यांना संधी मिळाली. खुद्द अमिताभ बच्चन यांच्या समोर बसून त्यांनी प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आणि ५० लाखांपर्यंत पोहोचले.
कैलास कुंटेवाड यांचं कुटुंब फक्त २ एकर कोरडवाहू शेतजमिनीवर अवलंबून होतं. शेतीमधून फारशी उत्पन्न होत नसल्यामुळे कैलास यांना मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत होता. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असतानाही आर्थिक अडचणींमुळे त्यांचं शिक्षण फारसं पुढं जाऊ शकलं नाही. आज ते त्यांच्या आई सुमनबाई, वडील रामभाऊ, पत्नी आणि दोन मुलांसह एक अत्यंत साधं आणि संघर्षमय जीवन जगत होते.५० लाख रुपये जिंकल्यानंतर कैलास यांनी सर्वप्रथम आपल्या कुटुंबाचा विचार केला. त्यांनी स्पष्ट केलं की, या पैशातून ते आपल्या मुलाचं उज्ज्वल शिक्षण पूर्ण करून त्याला मोठा अधिकारी बनवणार आहेत. केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण पिढीचा भविष्य घडवण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी बोलून दाखवली.बालानगरसारख्या छोट्या गावातून एक सामान्य माणूस थेट राष्ट्रीय मंचावर पोहोचतो आणि यश मिळवतो, ही बाब संपूर्ण पैठण तालुका आणि संभाजीनगर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. अनेक स्थानिक लोक, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी कैलास यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी भेट देत आहेत.
 
 
कैलास यांची ही यशोगाथा "सपने उन्ही के पूरे होते हैं, जो रातों में जागते हैं" याची जिवंत उदाहरण आहे. अपार मेहनत, सातत्याने प्रयत्न आणि आत्मविश्वास असला की यश नक्कीच मिळतं – हेच त्यांनी दाखवून दिलं आहे. शेतमजुरी करत आयुष्य काढणाऱ्या एका सामान्य माणसाने देशातील सर्वांत मोठ्या ज्ञानाच्या मंचावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे.आज कैलास कुंटेवाड हे केवळ त्यांच्या कुटुंबाचे नाही, तर हजारो सामान्य नागरिकांचेही प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांच्या यशामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की, संधी मिळाली तर ग्रामीण भागातील सामान्य व्यक्तीही असामान्य यश मिळवू शकते.
Powered By Sangraha 9.0