नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी

04 Oct 2025 19:55:00
तभा वृत्तसेवा
पुसद, 
Navi Mumbai International Airport : पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या नावाने ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्याची मागणी जनतेतून अधिक तीव्रपणे होत आहे. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन जोरकसपणे ही मागणी केली आहे.
 
jlk 
 
 
 
महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि कृषी विकासाच्या प्रवासात वसंतराव नाईक यांचे योगदान अद्वितीय आहे. त्यांनी राज्यात हरित क्रांतीच्या माध्यमातून शेतकèयांना समृद्धीचा मार्ग दाखविला. ग्रामीण भागातील जलसंधारण, सिंचन आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत झाला.
 
 
वसंतराव नाईक यांनी नवी मुंबईसारख्या नव्या शहराची संकल्पना मांडून महाराष्ट्राच्या शहरी नियोजनाला नवा चेहरा दिला. मुंबईवरील लोकसंख्या आणि औद्योगिक दडपण कमी करून संतुलित विकास साधावा, या दूरदृष्टीतून त्यांनी नवी मुंबईची संकल्पना साकारली होती.
 
 
त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास त्यांचेच नाव देणे हे त्यांच्या कार्याला योग्य अभिवादन ठरेल, असे वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे मत आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही या विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी प्रतिष्ठानने केलेली आहे.
 
 
वसंतराव नाईक हे केवळ शेतकèयांचे नेते नव्हते, तर ग्रामीण महाराष्ट्राला आधुनिकतेकडे नेणारे विचारवंत नेते होते. त्यांच्याच विचारांनी आजचे महाराष्ट्राचे विकास धोरण उभे आहे. त्यामुळे विमानतळाचे नामकरण त्यांच्याच नावाने करणे हे महाराष्ट्राच्या जनतेचा सन्मान असेल, असे या निवेदनात म्हटले आहे. या मागणीला बंजारा समाजासह सर्व समाज घटक व शेतकरी यांचा पाठिंबा आहे.
 
 
ही मागणी स्वीकृत झाल्यास, महाराष्ट्रातील शेतकरी, ग्रामीण जनता आणि तरुण पिढीमध्ये अभिमानाची भावना जागृत होईल, तसेच नाईक साहेबांच्या कार्याची गौरवशाली परंपरा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0