कारंजा बाजार समितीत नवीन सोयाबीनची आवक वाढली

04 Oct 2025 18:46:08
कारंजा लाड, 
karanja market committee खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. या पिकाची काढणी सध्या सुरू असून, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीनची आवक हळूहळू वाढू लागली आहे. ४ ऑटोबर रोजी तब्बल २०० क्विंटल नवीन सोयाबीनची नोंद झाली. यावेळी सरासरी दर ३६०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला असून, दर स्थिर असले तरी पावसाचा प्रभाव अद्याप जाणवत आहे. गेल्या दोन महिन्यापासून तालुक्यातील विविध भागांमध्ये सततच्या हलक्या ते जोरदार पावसाने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने सोयाबीनच्या शेंगा काळ्या पडल्या, दाण्याचा आकार कमी झाला, तर काही ठिकाणी अंकुर फुटण्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे सरासरी प्रति एकरी फक्त ३ क्विंटल पासून ५ क्विंटल पर्यंत उतारा मिळत असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
 
 
 

सोयाबीन
 
 
 
मागील वर्षी याच काळात हा उतारा ५ ते ६ क्विंटल इतका होता. तालुक्यातील काही शेतकरी लवकर येणार्‍या वाणांची लागवड करतात. या वाणांची काढणी सुरू झाली असून, काही शेतकर्‍यांनी काढणी बरोबरच माल बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र दर्जेदार सोयाबीनची आवक अद्याप कमी असल्याने व्यापार्‍यांकडून उच्च दर्जाच्या मालाला अधिक दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारंजा बाजार समितीत दरमहा सोयाबीनच्या आवक आणि भावात चढउतार दिसून येतात. सध्या दर ३६०० ते ४००० दरम्यान आहेत. व्यापार्‍यांच्या मते, पुढील काही दिवसांत आवक वाढेल आणि हवामान स्थिर राहिल्यास दरात मोठी घसरण होणार नाही. मात्र, पावसाचा अतिरेक आणि ओलसर माल वाढल्यास बाजारभावावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आतापर्यंत बाजारात कमी दर मिळत असल्याने शेतकरी सोयाबीन साठवणुकीला प्राधान्य देत होते.परंतु मागील वर्षीपासून मात्र दरात वाढ झाली नसल्याने शेतकरी सध्या माल घरी साठवून ठेवण्याचा पर्याय न निवडता थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे. त्यामुळे नवीन सोयाबीनची आवक वाढली आहे. परंतु अद्यापही उतारा कमी असल्याने उत्पन्न घटले आहे त्यामुळे चांगल्या भावाची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे.
सध्याच्या परिस्थितीत कारंजा परिसरातील शेतकर्‍यांनी उत्पादनातील घट आणि दरातील अनिश्चिततेचा सामना करताना सहकार्य आणि संयम दाखवणे आवश्यक आहे. कृषी धोरणांत हवामानानुसार विमा संरक्षण आणि बाजार व्यवस्थापन या दोन घटकांना अधिक बळकटी देणे ही काळाची गरज आहे.
मागील वर्षी संपूर्ण वर्षभर सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही. अखेरीस सोयाबीनला ४५०० ते ४६०० रुपयांचा दर मिळाला. मात्र सोयाबीनचे वजन घटले.त्यामुळे शेतकर्‍यांना फारसा फायदा झाला नाही.त्यामुळे आवक वाढल्यानंतर दर कमी होण्याच्या भीतीने यंदा सोयाबीन काढणीबरोबर शेतकरी विक्रीला प्राधान्य देत आहेत.
Powered By Sangraha 9.0