ज्येष्ठांचा सन्मान आणि हक्कांचे रक्षण हेच सरकारचे ध्येय

04 Oct 2025 20:51:43
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
Sakharam Mule : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उमरखेड येथील औदुंबर ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने ऑक्टोबर रोजी विरंगुळा केंद्र, राममंदिर वसंतनगर येथे भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
 
 
 
y4Oct-Sanmaan
 
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दिगंबर तवर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किसन वानखेडे व भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे आणि पोलिस अधिकारी मुंढे यांनीही उपस्थिती दर्शवली.
 
 
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, आरोग्य, संपत्ती संरक्षण व सन्मान यावर भर दिला. ते म्हणाले, वृद्धापकाळात ज्येष्ठांचा मुलांकडून छळ होत असल्यास, वैद्यकीय सोयी, आहार, प्रेम मिळत नसेल किंवा दिलेल्या संपत्तीबाबत अन्याय होत असेल, तर वृद्धांना ती संपत्ती परत घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे.
 
 
त्यांनी पुढे सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी न्यायाधिकरणाची स्थापना सरकारने केली आहे. त्यांना कोर्टाप्रमाणे सर्व अधिकार देण्यात आले असून, तीन महिन्यांत तत्काळ निर्णय दिला जाईल. शासन ‘आपले दारी’ योजनेद्वारे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे.
 
 
प्रमुख पाहुणे नितीन भुतडा यांनी उमरखेडच्या सर्वांगीण विकासाबरोबरच ज्येष्ठांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका मांडली. त्यांनी ज्येष्ठांसाठी आरोग्यविषयक सुविधा व सर्व सुविधायुक्त विश्रामगृह बांधण्याचा मनोदय व्यक्त केला. आमदार किसन वानखेडे यांनी स्वत:ला ज्येष्ठांच्या यादीत समाविष्ट करत, त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
 
 
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान, हक्क, न्याय व संरक्षणाबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन झाले. प्रास्ताविक भोसीकर यांनी, संचालन श्रीराम चव्हाण यांनी, तर आभार प्रदर्शन माने यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Powered By Sangraha 9.0