बुलढाणा,
Sanjay Sawkare, लोकांना चांगली सेवा देवून जिल्ह्याचे नावलौकिक करा शासन प्रशासन लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्या समन्वयातून प्रशासनातील सेवा लोकापर्यंत पोहचली पाहिजे त्यासाठी यंत्रणा सक्षम असावी असे आवाहन जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांना दि. ४ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यात केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी १५० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपीक संवर्गातील उमेदवारांना सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला आ. संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप वनसंरक्षक सरोज गवस, उपजिल्हाधिकारी डॅा. जयश्री ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार, माजी आमदार विजयराज शिंदे आदी अधिकारी व उमेदवार उपस्थित होते.सहपालकमंत्री संजय सावकारे पुढे म्हणाले, नव नियुक्त अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांना सोपवलेली कामे वेळेत पूर्ण करावीत, चांगले काम करणार्यांना चांगल्या संधी मिळतातच. लोकांना चांगली सेवा देत स्वत:चे आणि जिल्ह्याचे नाव मोठे करा. जिल्ह्यात चांगली पर्यटन स्थळे आहेत. पर्यटनवृद्धीसाठी मोठी संधी आहे, त्यादृष्टीने शासन प्रशासन काम करत आहे. या पर्यटनस्थळी विविध सुविधाही निर्माण केल्या जात आहेत. नव नियुक्त अधिकारी कर्मचार्यांनीसुद्धा जिल्ह्याच्या पर्यटनावृद्धीला चालना देण्यासाठी काम करावे, असे आवाहन सहपालकमंत्री सावकारे यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील म्हणाले की, नवनियुक्त कर्मचार्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपण इथे आहोत हे कायम स्मरणात ठेवून काम करावे. लोकांच्या सेवेसाठी पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने काम केले पाहिजे. गरजूंना सदैव मदतीचा हात दिला पाहिजे. प्रशासकीय कामकाजाच्या कोणत्याही टप्प्यावर कोणाचीही अडवणूक किंवा पिळवणूक होता कामा नये, असे त्यांनी आवाहन केले. तसेच अनुकंपा अंतर्गत क व ड वर्ग पदांच्या नियुक्त्या पारदर्शक पद्धतीने केल्या आहेत. यात ड वर्गची प्रतिक्षा यादी शुन्य झाली आहे. त्यांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. क वर्ग पदांच्या नियुक्त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जाणार आहेत. नवनियुक्त १८६ अनुकंपा आणि ७१ एमपीएससी उमेदवारांना लवकरच जिल्हास्तरावर एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांच्या हस्ते १८६ अनुकंपा उमेदवारांना आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची शिफारस प्राप्त ७१ उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या उमेदवारांना राज्य शासनाच्या विविध विभाग, जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभाग, नगरपरिषद, पोलीस इ विभागांमध्ये नियुक्ती देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले.