दिल्लीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोंधळ; भटक्या कुत्र्यांनी प्रशिक्षकांवर हल्ला

04 Oct 2025 09:36:36
नवी दिल्ली,
Stray dogs attack trainers राजधानीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ दरम्यान भटक्या कुत्र्यांनी गोंधळ माजवला आहे. केनिया आणि जपानच्या दोन प्रशिक्षकांवर कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतला, ज्यामुळे या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दोन्ही प्रशिक्षकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या ते धोक्याबाहेर आहेत.
 
 
Stray dogs attack trainers
केनियाच्या संघाचे प्रतिनिधी जोएल अतुती यांनी सांगितले की, प्रशिक्षक डेनिस मराजिया आपल्या एका खेळाडूशी कॉल रूमजवळ बोलत असताना अचानक एक भटका कुत्रा धावत आला आणि त्याच्या पायाला चावा घेतला. त्याच्या पायातून रक्तस्त्राव सुरू झाला. वैद्यकीय पथकाने तत्काळ मदत केली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. आवश्यक उपचार आणि इंजेक्शन देण्यात आल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
दुसरी घटना थोड्याच वेळात जपानी प्रशिक्षक मेइको ओकुमात्सु यांच्यासोबत घडली. त्या सराव ट्रॅकजवळ आपल्या खेळाडूंना प्रशिक्षण देत असताना त्यांनाही एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. दोन्ही प्रशिक्षकांना स्टेडियममधील वैद्यकीय युनिटकडून तत्काळ उपचार देऊन सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारानंतर ते त्यांच्या संघासोबत परत गेले. आयोजन समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मैदानाजवळील परिसरात काही स्थानिक लोकांकडून भटक्या कुत्र्यांना अन्न दिले जात असल्याने हे प्राणी वारंवार स्टेडियम परिसरात परत येत होते. यामुळे ३ ऑक्टोबर रोजी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कुत्र्यांनी परदेशी प्रशिक्षकांवर हल्ला केला. आयोजकांनी तत्काळ उपाययोजना करत एमसीडीच्या कुत्रे पकडणाऱ्या पथकांची कायमस्वरूपी नेमणूक केली आहे.
 
याशिवाय, परिसरातील सर्व भटक्या प्राण्यांना पकडून त्यांना प्राणी आश्रयस्थानात हलविण्यासाठी विशेष वाहनव्यवस्था करण्यात आली आहे. आयोजकांनी स्पष्ट केले की, सर्व कारवाईदरम्यान प्राणी कल्याण नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, मात्र सहभागींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या घटनांनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली असून, स्टेडियम परिसरात आता सतत गस्त आणि निरीक्षण ठेवले जात आहे.
Powered By Sangraha 9.0