नवी दिल्ली
two-headed python video सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. काही हास्याचे क्षण देतात, काही भावनिक करतात, तर काहींचा आश्चर्यचकित करणारा प्रभाव असतो. असाच एक थक्क करणारा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच गाजत आहे, ज्यामध्ये जंगलात एक दोन तोंडांचा अजगर सरकतांना दिसतो आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हा खरा आहे की बनावट, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
केवळ २८ सेकंदांचा हा व्हिडिओ एक्स (पूर्वीचा ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @jamil2832 या युजरने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "कुदरत का करिश्मा पाहा. अजूनपर्यंत आपण शेपटी नसलेल्या सापांना दोन तोंडाचा समजत होतो. पण इथे पाहा, एकाच बाजूला दोन तोंडं आहेत."यासोबतच यामध्ये हा साप 'टू-हेडेड पाइथन' असून तो मूळतः मध्य व पश्चिम आफ्रिकेमध्ये आढळतो, अशी माहिती देण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये एक अजगर जमिनीवरून हळूहळू सरकताना दिसतो. विशेष म्हणजे त्याचे संपूर्ण शरीर इतर सामान्य सापांसारखेच आहे, मात्र त्याच्या शरीराच्या एका टोकाला दोन स्वतंत्र डोकी जोडलेली दिसतात. ही स्थिती पाहून अनेकांनी आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवायला नकार दिला आहे. काही युजर्सनी हा एखाद्या विज्ञानकथेतील सीन असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी हे एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा कमाल असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
मात्र सर्पतज्ज्ञांच्या मते, ही एक दुर्मिळ जैविक विकृती आहे, ज्याला 'बायसेफली' (Bicephaly) असे म्हणतात. या विकृतीमध्ये एकच शरीर असून दोन डोकी असतात. ही अवस्था जरी नैसर्गिकदृष्ट्या शक्य असली, तरी अशा सापांचे आयुष्य फारसे दीर्घ नसते. दोन डोकी असल्यामुळे अन्नसंकलन, दिशा ठरवणे आणि शिकार करताना अडचणी येतात, ज्याचा त्यांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम होतो.व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून १३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शेकडो लोकांनी याला लाईक केले असून विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एक युजर म्हणतो, "हा व्हिडिओ पाहून विश्वास बसत नाही, असं वाटतंय जणू एखाद्या सिनेमातील दृश्य आहे." तर दुसरा म्हणतो, "प्रकृतीचे चमत्कार म्हणजे केवळ अचंबित करणारे असतात."अस्सल आणि कृत्रिम यामधील सीमारेषा दिवसेंदिवस धूसर होत चालली असली, तरीही या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा नैसर्गिक विचित्र घटनांची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अजगरासारख्या धोकादायक प्राण्यातही अशी जैविक विचित्रता दिसल्याने अनेकांचे लक्ष या व्हिडिओकडे वेधले गेले आहे.