कोलंबो :
India vs pakistan womens world cup भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघांमध्ये आज होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष लागले आहे. आशिया खंडातील या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणं हेच एक मोठं आकर्षण असताना, या सामन्यावर मुसळधार पावसाचे सावट कायम आहे. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होणार असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामना होईपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोलंबोमध्ये सातत्यानं पाऊस पडत असून, ४ ऑक्टोबर रोजी श्रीलंका-ऑस्ट्रेलिया सामना याच कारणामुळे रद्द झाला होता. आजही दुपारी १२ वाजेपर्यंत पावसाची शक्यता ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सामना सुरु होण्याच्या वेळेपर्यंत पाऊस थांबला, तरी ढगाळ हवामानामुळे खेळावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामन्यादरम्यान पाऊस झाल्यास सामना संपूर्णपणे रद्द होऊ शकतो, आणि अशा स्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल.या सामन्याला राजकीय पार्श्वभूमीमुळेही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आशिया चषक स्पर्धेदरम्यान भारतीय पुरुष संघानं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. हीच भूमिका महिला संघही घेणार आहे. सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय महिला खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाहीत. सामन्यादरम्यान किंवा नंतरही कोणतीही संवाद साधण्यात येणार नसल्याचं भारतीय संघ व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे.
क्रीडापटूंच्या कौशल्याच्या दृष्टीने पाहिल्यास, भारत हा सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. आपल्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर मात करत स्पर्धेला विजयी सुरुवात केली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला बांगलादेशकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये आजवर झालेल्या सर्व ११ सामन्यांत भारतानं विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही भारताकडून विजयाचीच अपेक्षा आहे.भारताच्या संघात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. तर पाकिस्तानकडून कर्णधार फातिमा सना, मुनीबा अली आणि डायना बेग यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.आजचा सामना नेहमीसारखाच भावनिक आणि क्रीडारसिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असला, तरी हवामानाची अनिश्चितता आणि राजकीय पार्श्वभूमी यामुळे त्याला वेगळंच परिमाण लाभलं आहे. मैदानात दोन संघांची सरस कामगिरी किती रंगते, हे पाहणं आता पावसाच्या दयेवर अवलंबून आहे.