वर्धा,
Atmanirbhar Bharat campaign सण उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. यानिमित्ताने २५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, मेळावे आणि संपर्क अभियान राबवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी दिली.
आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाची माहिती देण्याकरिता आज रविवार ५ रोजी भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, महामंत्री राहुल चोपडा, संकल्प अभियानाच्या संयोजक अर्चना वानखेडे, जयंत सालोडकर, चेतना कांबळे यांची उपस्थिती होती.
गाते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वावलंबी भारताचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्यानुसार स्वदेशी वापराची शपथ घेण्यासाठी, प्रेरित करण्याकरिता भारत संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. १५ ते १७ ऑटोबर दरम्यान चारही विधानसभा मतदार संघात स्वदेशी संकल्प रथ काढण्यात येणार आहे. ११ ते १५ दरम्यान मंडळ स्तरावर महिला बचत गट संमेलन, १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान लघु उद्योजकांचे संमेलन, मंडल स्तरावर युवा संमेलन, विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेणे, छोटे व्यावसायिक, फेरीवाले यांचे संमेलन मंडळ स्तरावर घेतल्या जाईल. तसेच २५ डिसेंबरपर्यंत चर्चासत्र, निबंध, कविता आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
आ. बकाने यांनी अमेरिकन टेरिफने काहीही होणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी जेनरेटीक औषधांचे जहाज इतर देशांकडे वळवण्याचा झटका दिला. देशात ÷व्होकल फॉर लोकलला प्रतिसाद मिळत आहे. त्यानिमित्ताने महिला बचत गटाचे संमेलन घेऊन त्यांनी स्वदेशीसाठी प्रेरणा देण्याचे काम यानिमित्ताने केल्या जाईल, असे आ. राजेश बकाने म्हणाले. माजी खासदार वाघमारे यांनी दसरा, दिवाळी सणांमध्ये नागरिकांनी स्वदेशीचा वापर करावा याचा प्रचार प्रसार करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.