यवतमाळची सून बॉलीवूडमधील टॉप फॅशन कॉस्च्युम डिझायनर..!

05 Oct 2025 19:17:22
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
sayali-sontakke : यवतमाळच्या सुप्रसिद्ध नटराज संगीत कला अकादमीचे डॉ. किशोर सोनटक्के यांची सून आणि अमरावतीचे माहेर असलेली सायली अजिंक्य सोनटक्के-ठाकरे यांनी चंदेरी दुनियेत फॅशन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
 
 
 
y5Oct-Sayali-Thakare
 
 
 
सायली आज बॉलीवूडमधील आघाडीची ‘कॉस्च्युम डिझायनर’ म्हणून ओळखली जाते. सध्या त्या बॉलीवूडचे नामांकित फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यासोबत कार्यरत आहेत. सायली प्रख्यात संगीतकार ए. आर. रहमान यांचे शिष्य, युवा संगीतकार, गायक, मूळचे यवतमाळकर अजिंक्य सोनटक्के यांची पत्नी आहे. यवतमाळच्या या कर्तबगार सुनेवर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
 
 
धर्मा प्रॉडक्शनच्या आत्ताच प्रदर्शित झालेल्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारीया’ चित्रपटातील नायिका जान्हवी कपूर व सानिया मल्होत्रा यांची वेशभूषा सायली सोनटक्के यांनी डिझाईन केली आहे. चंदेरी दुनियेत ‘कॉस्च्युम डिझायनर’ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या सायलीने पन्नासच्या वर चित्रपटांत ही जबाबदारी पार पाडून आपली छाप पाडली आहे. तिने अनेक मोठ्या चित्रपटांसाठी हे काम केले आहे. त्यात रॉकी और रानी की प्रेम कहानी, सर्कस, अतरंगी रे.., गेम चेंजर, परम सुंदरी या चित्रपटांचा विशेष उल्लेख करता येईल.
 
 
सायलीने विविध चित्रपट, गाणी, चित्रपट कार्यक्रमांसाठी अनेक दिग्गज अभिनेत्रींची वेशभूषा केली आहे. त्यामध्ये क्रिती सेनन, आलिया भट, सारा अली खान, कॅटरिना कैफ, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सानिया मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, रेखा, कियारा अडवाणी, जॅकलिन फर्नांडिस, काजोल, जया बच्चन, झीनत अमान, सोनम वाजवा, फातिमा सना शेख, राधिका आपटे, मानुषी छिल्लर यांचा समावेश आहे.
नीता अंबानीची केली वेशभूषा
 
 
देशातील प्रसिद्ध उद्योगपती नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या भव्य उद्घाटन प्रसंगी त्यांची वेशभूषा व स्टायलिंगचे काम सायली सोनटक्केने केले आहे. सध्या त्या गुस्ताख इश्क, साली मोहब्बत आणि पती पत्नी और वो दोनो या आगामी चित्रपटांसाठी कॉस्चुम डिझाईन करत आहेत.
Powered By Sangraha 9.0