हिंगणघाट,
Karanja शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी अंगावर असलेल्या पोलिसांवरच गुन्हेगार हल्ले करून जखमी करीत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणाचे काय, असा प्रश्न शहरात घडलेल्या एका घटनेमुळे उभा ठाकला आहे. शहरातील गजबजलेल्या कारंजा चौकात शेकडो नागरिकांच्या समक्ष गुन्हेगारी पृष्ठभूमी असलेल्या एका युवकाकडून थेट पोलिसावर कटरने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवार ४ रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कारंजा चौकात देवी विसर्जन मिरवणुकी निमित्ताने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या दरम्यान ७ ते ८ युवकांचा भररस्त्यावरच आपसात वाद सुरू झाला. हा वाद सोडवण्यासाठी गस्तीवर असलेले डीबी पथक घटनास्थळी धावून गेले. दोन्ही गटाची समजूत घालत त्यांना बाजूला करत असताना यातील गुन्हेगारी पृष्ठभूमी असलेल्या विशाल उर्फ वांढरू उरवते (३०) याने कर्तव्यावर असलेल्या पोलिस नायक असीम मतीन शेख (३७) यांच्या डाव्या छातीवर चावा घेत कटरने वार केला. या दरम्यान विशाल कुडमतेला इतर पोलिसांनी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता करण वाटोडकर (२४) याने सुद्धा लाथाबुयांनी पोलिसांवर हल्ला केला. हे दोन्ही आरोपी संत कबीर वार्ड हिंगणघाट येथील रहिवासी असुन त्यांना पोलिसांनी त्याच वेळी अटक केली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.